दोन शिवसेनेमध्ये कल्याणची लढत…

दोन शिवसेनेमध्ये कल्याणची लढत…

कल्याण लोकसभा मतदार संघ हा ठाणे जिल्ह्यातील लक्ष्यवेधी असलेला मतदार संघ आहे. या मतदार संघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे उमेदवार असणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी कल्याणसाठी ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, दरेकर यांना उमेदवारी जाहीर करून ठाकरे गटाने ही लढत मुख्यमंत्र्यांसाठी काहीशी सोपी केली आहे. या लोकसभा मतदार संघात मनसेच्या तिकिटावर दरेकर यांनी 2009 मध्ये एक निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली होती. म्हणूनच आता ठाकरे गटात असलेल्या दरेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

या लोकसभा मतदार संघात जवळपास 20 लाख मतदार आहेत. एकास एक लढत येथे होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या वर्षभरापासून या मतदार संघात प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली आहे. तसेच अनेक विकास कामांना गती देण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे महायुतीच्या दृष्टीने ही जागा सोपी मानली गेली होती. आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा होणार्‍या लढतीत सध्या गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात असलेले गणपत गायकवाड यांचे समर्थक काय भूमिका घेतात, याकडे विशेष लक्ष असले तरी महायुतीकडे तब्बल पाच आमदार असल्याने या जागेचे टेन्शन महायुतीला नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघ या मतदार संघात असल्याचा फायदा महाविकास आघाडीला आहे. त्याशिवाय दरेकर या स्थानिक महिला नेत्या असल्याने त्यांच्या प्रचार यंत्रणेकडे सर्वांचे लक्ष आहे.

यापूर्वी सुरुवातीला सुषमा अंधारे आणि वरुण सरदेसाई अशी नावे सुरुवातीला चर्चेत होती. त्याचबरोबर माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांमध्ये वैशाली दरेकर यांना रिंगणात उतरवून ठाकरे गटाने महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण 20 लाख मतदारांपैकी 9 लाख महिला मतदार आहेत. तर 11 लाख पुरुष मतदार आहेत. जवळपास 50 टक्के मतदान होण्याचा या मतदार संघाचा इतिहास आहे. भाजपमधील अंतर्गत कुरघोडी आणि शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार यामुळे भाजप शिवसेनेत असलेता अंतर्गत संघर्ष या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. श्रीकांत शिंदे हे गेल्या दोन लोकसभेच्या निवडणुका मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार आहेत. ते पूर्वी एकसंध शिवसेनेतून लढत होते. आता शिवसेना विभक्त झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक असणार आहे. वैशाली दरेकर यांना 2009 सालचा लोकसभा निवडणुकीचा अनुभव आहे. त्यावेळी त्यांना 1 लाख 2 हजार मते मिळाली होती.

2010 च्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मनसेतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिले. शिवसेनेच्या फुटीनंतर मात्र त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाई तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची लढाई आहे. दोन्ही बाजूकडचे कार्यकर्ते हे ईर्ष्येने प्रचाराला उतरले आहेत. 20 एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तोपर्यंत विभाग बैठकांवर भर देण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कल्याणची लढाई ही उत्कंठावर्धक होईल, हे निश्चित.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news