वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेत सर्व ग्रह आपापल्या विशिष्ट कक्षेतून सूर्याभोवती फिरत असतात. मात्र सौरमालिकेच्या निर्मितीनंतर 60 ते 100 दशलक्ष वर्षांपूर्वी हे ग्रह अशा कक्षांमध्ये स्थिर होण्यापूर्वी एक गोंधळाचे वातावरणच होते. विशेषतः गुरुसारख्या निव्वळ वायूचे गोळे असलेल्या मोठ्या ग्रहांकडून असे गोंधळ निर्माण होत होते. आता खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की त्या काळात थिया नावाच्या एका गहाची कक्षा गुरु ग्रहामुळे अस्थिर झाली व त्याची पृथ्वीला धडक झाली. या धडकेमुळे जो तुकडा अंतराळात उडाला तोच चंद्र बनून पृथ्वीभोवती फिरू लागला. अशा प्रकारे चंद्राची निर्मिती होण्यामागे गुरुचेही एक कारण आहे.
सुरुवातीच्या काळात सर्व ग्रह स्थलांतर करीत होते व आपल्या कक्षेत स्थिर झालेले नव्हते. अशा काळातील गुरूमुळे हा मंगळाच्या आकाराचा थिया नावाचा 'प्रोटोप्लॅनेट' आपल्या कक्षेतून भरकटून पृथ्वीला धडकला. या धडकेतून अंतराळात पृथ्वीच्या धुळ-माती व खडकांचा जो ढिगारा अंतराळात उडाला, त्यापासून चंद्राची निर्मिती झाली. या संशोधनासाठी वेगवेगळे लघुग्रह आणि धुमकेतूंचाही अभ्यास करण्यात आला. मात्र ही घटना नेमकी कशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुरुवातीच्या काळातील सौरमालिकेत गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे मोठ्या आकाराचे वायूचे गोळे होते. ते एकमेकांच्या अगदी जवळही होते. कालांतराने नेपच्यूनच्या पलीकडील प्लॅनेटेसिमल्स गुरुत्वाकर्षण क्रियांमुळे शनी, युरेनस आणि नेपच्यूनचे पुढे पुढे स्थलांतर होत गेले. उलटपक्षी गुरू अंतर्गत भागात स्थलांतर करू लागला. त्याच्यामुळे त्यावेळी अस्तित्वात असलेल्या थिया ग्रहाला अस्थिर बनवले व त्याची पृथ्वीशी धडक झाली.