लाखो भाविकांचे श्रद्धास्थान : जोतिबा

जोतिबा
जोतिबा

महाराष्ट्राच्या संपन्न आध्यात्मिक आणि लोकसांस्कृतिक परंपरेमध्ये करवीरनगरीचे आणि कोल्हापूरचे एक वेगळे महत्त्व आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणार्‍या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. त्याचबरोबर जोतिबा हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जातेे.

जोतिबा हे खंडोबाप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचे कुलदैवत आहे. दख्खनचा राजा म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या जोतिबाला केदारेश्वर, असेही म्हटले जाते आणि त्यानुसार तो बद्रीकेदाराचे रूप आहे, असे मानले जाते. केदारविजयातील कथेनुसार असुरांचा संहार करण्यासाठी जगज्जननीने आरंभिलेल्या संग्रामामध्ये तिला साहाय्य करण्यासाठी जोतिबा हिमालयातून दक्षिणेत आला, असा उल्लेख आढळतो. याखेरीज जोतिबा हा केदरनाथ या बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या लिंगाचे मूळ स्थान आहे, असे सांगितले जाते. काहींच्या मते जोतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप आहे. कोल्हापूरच्या वायव्येस साधारण 20 किलोमीटर अंतरावर जोतिबाचा डोंगर आहे.

जोतिबासंदर्भातील एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात करवीर परिसरात रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी भयंकर उच्छाद मांडला होता. त्यावेळी या राक्षसांच्या जाचापासून मुक्तता करण्यासाठी अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याचे आर्जव केले. त्यानुसार केदारेश्वरांनी या शक्तिशाली खलांशी युद्ध केले. या युद्धात रत्नासुराचा वध ज्या डोंगरावर करण्यात आला, त्याला वाडी रत्नागिरी असे नाव पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने भविष्यात अशा प्रकारचे संकट पुन्हा येऊ नये, यासाठी 'तुझी कृपाद़ृष्टी सदैव राहू दे' अशी विनंती केली. तद्नुसार अंबाबाईच्या रक्षणासाठी जोतिबाचे मंदिर उभे राहिले.

जोतिबाचे मंदिर हे सुमारे 300 वर्षे जुने आहे. मंदिरात प्रवेश करताना प्रथम भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर तीन देवळांचा समूह द़ृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. संत नावजीनाथ नावाचे जोतिबाचे एक परमभक्त होते आणि त्यांनी या मूळ देवालयाचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. तथापि, आताचे मंदिर 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी भव्य स्वरूपात पुनर्चित करून बांधलेले आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय असून, त्याचे बांधकाम 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते खांबांच्या आधाराशिवाय उभे आहे.

प्राचीन भारतीय स्थापत्य कलेतील आधुनिकता यातून दिसून येते. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणांचे नंदी आहेत. या मंदिरातील रामलिंग मंदिराचे बांधकाम 1780 मध्ये मालजी निकम-पन्हाळकर यांनी केलेले आहे. या देवळाजवळच चोपडाई देवीचे मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम 1750 मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. येथून जवळच यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून, जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. येथील मंदिरेही हेमाडपंती पद्धतीची असून, तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव त्यामध्ये स्पष्ट रूपाने आढळतो.

जोतिबा मंदिराच्या प्रांगणातील दगडी दीपमाळ ही भाविकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. जोतिबाची मुख्य मूर्ती ही सुमारे 4 फूट 3 इंच उंचीची असून, ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. चतुर्भूज असणारी ही मूर्ती डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत आहे. मूर्तीच्या उजव्या हातात खड्ग, वर डमरू, डावीकडे त्रिशूल आणि खाली अमृत पात्र आहे; तर कमरेला पंचा असून, गळ्यात कंठहार आहे. माथ्याला नऊ वेटोळ्यांची जटा आहे. मूर्तीच्या हातामध्ये कडे आणि पायांत तोडे असून, कानात नाथपंथी गोल कुंडले आहेत. दररोज श्रींच्या वस्त्रालंकाराने सालंकृत पूजा बांधली जाते. जोतिबाचे दर्शन घेण्याआधी काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

– सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news