पुढारी ऑनलाइन डेस्क : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिस ठाण्यात भादंवी कलम 143, 148, 149, 120 (ब), 353, 307, 332, 506(2) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) समर्थकांनी जबर मारहाण केली आहे. ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच हा सर्व मारहाणीचा प्रकार घडला आहे. हा मारहाणीचा प्रकार घडण्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये आव्हाड कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. सहाय्यक आयुक्तांना झालेल्या या मारहाणीनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मुंब्रयाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबत संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे स्वतः आव्हाड यांनी सांगितले. आव्हाड यांच्यासह कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची माहिती देणारी ठाणे पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपनंतर संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांच्यावर ठाणे पालिका मुख्यालयाच्या गेटवरच मारहाण केल्याचा घटना घडली.
सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी ते सुरक्षारक्षक धावले आणि त्यातील एकाने बंदुक बाहेर काढली. तरीही ते कार्यकर्ते त्याचठिकाणी उभे होते. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.
हेही वाचा