वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा; विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास उडवल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना (शुक्रवार) रात्री १० वाजता औरंगाबाद -सोलापूर महामार्गावरील गोंदी फाट्याजवळ घडली. रामेश्वर काशिनाथ शिर्के (वय ४०) रा. धाकलगाव ता. अंबड असे मृत व्यक्तीचे नाव असून, आपल्या दोन्ही मुलींना भेटून शिर्के हे गावाकडे येत असताना हा अपघात झाला. अपघात होताच ट्रॅक्टरसह ट्रॅक्टर चालक फरार झाला.
याविषयी अधिक माहिती अशी की, दुचाकी क्रमांक एम एच २१ ही गेवराईहून धाकलगावकडे जात होती. यावेळी औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील गोंदी फाट्याजवळ डबल ट्रॉली असलेला रिकामा ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने शहागडकडे येत होता. यावेळी या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रामेश्वर काशिनाथ शिर्के (वय ४०) रा.धाकलगाव ता. अंबड हे जागीच ठार झाले. धडक देताच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह फरार झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शहागड प्राथमिक केंद्रात हलविला. मात्र शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह नसल्याने हा मृतदेह वडीगोद्री प्राथमीक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.
गेवराई तालुक्यातील कोल्हेर व सिरसदेवी येथे दोन्ही मुलींना भेटून रामेश्वर शिर्के हे घरी येत असताना शहागड गोंदी फाट्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये ते ठार झाले. त्यांची मुलींसोबतची ही शेवटची भेट ठरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन भाऊ, भावजया, एक मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे.