जळगाव: पुढारी वृत्तसेवा
एकनाथ खडसे यांचा जावई गेल्या दोन-तीन वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यांना अजूनही जामीन मिळत नाही. तो गरीब माणूस असून, केवळ खडसे यांच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये अडकला असल्याची टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
भुसावळ शहरात एका उद्घाटन सोहळ्याला मंत्री महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. खडसे म्हणाले होते की, गिरीश महाजन यांनी माझ्यामागे ईडी लावली म्हणून त्यांच्यावर मी मोका लावला, असा खळबळजनक आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला. मंत्री महाजन यांनी एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी माझ्यावर मोका लावून चांगले काम केले आहे. खोट्या गोष्टी आता समोर आल्या आहेत, या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरु आहे. मी खडसेंवर आरोप केलेले नव्हते, अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले होते, त्या खडसेंच्या विरोधात गेल्यामुळे त्यांची चौकशी झाली होती. चौकशीत ते सर्व सिद्ध झाल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
मी जर तोंड उघडलं तर…
जिल्हा दूध संघाच्या चोरीचे प्रकरण पुढे आला आहे. त्याचे सर्व पुरावे आहेत. आपण किती मोठे चोर आहोत हे लपवण्यासाठी हवेत गोळीबार करायचा. मला जास्त बोलायला लावू नका. मी जर तोंड उघडलं तर लोक तुमच्या तोंडाला काळ लावतील. जावई जवळपास दोन-तीन वर्षापासून जेलमध्ये आहे, त्यांना जामीन मिळत नाही. कुटुंबीय कोर्टाने थांबवलं म्हणून सध्या बाहेर आहेत, त्याची कल्पना तुम्हाला आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर तो मोका लावला तो कसा लावला त्याची कल्पना मला आहे. तुमच्या मागे ईडी लागली आहे, हे सर्व लोक बघत आहेत. त्याचे पुरावे देखील आहेत. दहा दहा वेळा सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्हाला त्यात जामीन मिळत नाही. तुमचा जावई हा गरीब माणूस आहे तो तुमच्यामुळे अडकला आहे. तुमच्या स्वार्थापायी त्याला अडकवण्यात आलं याचे दुःख मलाही आहे," असेही मंत्री महाजन म्हणाले.