जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून, त्यांनीच शनिवारी (दि.६) याबाबत पत्रकारांना माहिती देतांना आपण लवकरच भाजपत फेरप्रवेश करत असल्याचे सांगितले.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाला होत्या. यापूर्वी त्यांची सून खासदार रक्षा खडसे यांनी देखील 'वेट अँड व्यांच' असे वक्तव्य केल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. शनिवारी (दि.६) त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. गेल्या आठवडयात खडसे यांनी दिल्ली गाठत व्यासंदर्भात पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केली होती. मात्र स्थानिक नेत्यांचा तसेच काही मातब्बर भाजप नेत्यांचा विरोध पाहता त्यांचा पक्षप्रवेश लांबला होता. मात्र पत्रकारांशी बोलताना त्यांनी लवकरच स्वगृही परतणार असल्याचे म्हटले आहे. ते आज रविवार (दि.७) रोजी मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. भाजपचे गिरीश महाजन आणि खडसे यांच्यात गेल्या दोन वर्षापासून आरोप-प्रत्यारोप सुरु होते. मात्र त्यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीशी जुळवून घेत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. रक्षा खडसे यांना भाजपने रावेरमधून पुन्हा तिकीट दिले आहे. त्यामुळे खडसे यांची एकप्रकारे कोंडी होत त्यांना भाजपत पुन्हा प्रवेशाशिवाय पर्यायच उरला नव्हता.
हेही वाचा: