EVM VVPAT : इव्हीएमवरून इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे धाव

EVM VVPAT : इव्हीएमवरून इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे धाव

Published on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : EVM VVPAT : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससह इंडिया आघाडीने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) चा मुद्दा तापवायला सुरुवात केली आहे. पुन्हा इव्हीएम मशीनसोबत वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनबद्दल काही सूचना देण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्तांना वेळ मागितला आहे. यापूर्वीही त्यांनी २० डिसेंबरला वेळ मागितला होता. मात्र त्यांना वेळ देण्यात आला नाही. काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला आहे.

१९ डिसेंबरला झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत एक ठराव संमत करण्यात आला होता, ज्यामध्ये आघाडीतील घटक पक्षांनी इव्हीएमसह व्हीव्हीपॅटसंदर्भात काही प्रश्नांसह तपशीलवार निवेदन सादर केले. मात्र निवडणूक आयोग भेटीसाठी टाळाटाळ करत आहे, अये या ठरावात म्हणण्यात आले होते. त्याच्या पुढच्या दिवशी (२० डिसेंबर) पुन्हा इंडिया आघाडीने पत्र लिहीले. मात्र तेव्हाही आयोगाकडून भेटीचा वेळ देण्यात आला नव्हता. (EVM VVPAT)

पुन्हा मंगळवारी (२ जानेवारी) जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहीले आहे. त्यांनी पत्रात लिहील्यानुसार, सर्वप्रथम ९ ऑगस्ट २०२३ ला इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने एक निवेदन मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले होते. त्यापुढेही सलग ३ वेळा इंडिया आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र तेव्हाही त्यांना वेळ देण्यात आला नाही. त्यानंतर २३ ऑगस्टला इंडिया आघाडीकडून निवेदनाद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाच्या वतीने विविध दाखल्यांसह देण्यात आली. मात्र निवडणूक आयुक्तांकडे भेटीसाठी वारंवार वेळ मागूनसुद्धा वेळ देण्यात आला नाही. (EVM VVPAT)

त्यानंतर पुन्हा एकदा व्हीव्हीपॅट मशीनबद्दल काही सूचना देण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा, इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे तीन-चार सदस्यीय शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटायला येईल. व्हीव्हीपॅट मशीनबद्दल निवडणूक आयोगाने आमची भूमिका समजून घ्यावी, अशी विनंती जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीच्या वतीने केली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर इव्हीएमवर काही स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या वतीने फोडण्यात आले होते.

इंडिया आघाडीची मागणी काय?

इव्हीएमद्वारे मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटद्वारे बाहेर पडणारी पावती बॉक्समध्ये पडण्याऐवजी मतदाराकडे सोपवली जावी. या पावतीची पडताळणी केल्यानंतर ती एका वेगळ्या मतपेटीत ठेवली जाईल. त्यानंतर संपूर्ण व्हीव्हीपॅट पावत्यांची एकत्र मोजणी केली जावी, अशी इंडिया आघाडीची मागणी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news