सभ्य गृहस्थ असलेल्या उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होणे ठरली चूक; भगतसिंह कोश्यारी यांचे टीकास्त्र

भगतसिंह कोश्यारी
भगतसिंह कोश्यारी
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हे एक संत व सज्जन गृहस्थ आहेत. ते उगाच कोणाचे तरी एकूण मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले. त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवून त्यांचा हकनाक बळी दिला गेला. त्यांनी मुख्यमंत्री होण्याऐवजी आपला पक्ष सांभाळला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी टीका राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. मला त्यांनी विमानातून खाली उतरविले होते. आज त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या गादीवरून खाली उतरावे लागले आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

भगतसिंह कोश्यारी हे नुकतेच राज्याच्या राज्यपालपदावरून पायउतार होऊन उत्तराखंडला परतले आहेत. त्यांच्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत महाविकास आघाडीशी त्यांचा सातत्याने संघर्ष उडाला. कोश्यारी यांनी जागोजागी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोश्यारी यांनी राज्यपालपद सोडल्यानंतर आपले मन मोकळे केले असून उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे यांना अनेक मुद्द्यांवर खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणे हीच त्यांची चूक होती, असे कोश्यारी म्हणाले. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना काहींनी बळी दिले, असे कोश्यारी म्हणाले.

दमबाजी केल्याने बारा आमदारांची यादी रोखली

कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी शिफारस केलेली बारा सदस्यांची यादी शेवटपर्यंत रोखून धरली. त्या मुद्दयावरही कोश्यारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मला १२ नावांची शिफारस करताना उद्धव ठाकरे यांनी पाच पानांचे पत्र लिहिले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पण पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत कायदे सांगता. १५ दिवसांत यादी मंजूर करा अशी मुदत टाकता. राज्यपालांवर असा दबाव टाकता येत नाही. संविधानात अमुक एक दिवसात यादी मंजूर करा, असे कुठेही लिहिलेले नाही. कधीतरी ते पत्र समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. मी दुसऱ्याच दिवशी सही करणार होतो. पण पत्रातून अशी दमबाजी केल्याने हा निर्णय टाळला, असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. अशा पत्राऐवजी उद्धव ठाकरे यांनी शिष्टाचार पाळून पाच ओळीत नावासह पत्र द्यायला हवे होते, असेही त्यांनी सुनावले.

माझे त्यांच्याशी संबंध चांगले होते. मात्र, त्यांचे सल्लागार कोण होते ते माहीत नाही? त्यांचे आमदार येऊन सांगत होते की, आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे शकुनीमामाच्या जाळ्यात अडकले होते. माहिती नाही कोण होता तो शकुनीमामा, अशी बोचरी टिप्पणी करताना माणूस जर सरळमार्गी व सज्जन नसता आणि राजकारणी असता तर शरद पवारांसारख्या राजकारणातील ट्रिक माहिती असत्या तर त्यांनी असे पत्र लिहिले असते का? असा सवालही कोश्यारी यांनी केला.

पहाटे शपथ देण्याचा निर्णय योग्यच !

कोश्यारी यांनी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिलेली शपथ हा कोश्यारी यांनी आपला निर्णय योग्यच असल्याचे ठासून सांगितले. ते म्हणाले, माझ्याकडे रात्रीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आमदारांची यादी घेऊन आले. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्यांनी आपल्या आमदारांच्या सहीचे पत्र आणले होते. त्यांनी फडणवीस यांचे समर्थन करून एकत्र सत्ता स्थापन करण्याची तयारी दाखविली. सरकार बनविण्यासाठी आवश्यक बहुमत असल्याची खात्री झाल्यावर मी राष्ट्रपती राजवट उठवून त्यांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. आता हा शपथविधी पहाटे झाला त्यात काहीही गैर नाही. तो कधी व्हावा याच्याशी माझा संबंध नाही. फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यामुळे त्यांना पहाटे शपथ दिली गेली, असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. आपण हा निर्णय घटनेच्या चौकटीत घेतला होता. अजित पवार काही मामुली व्यक्ती नव्हते. तेच पुढे माविआचे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांचे पत्र पाहूनच फडणवीस आणि पवार यांचा शपथविधी करण्याचा निर्णय झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news