बहार विशेष : साम्राज्यवादी चीनला चोख प्रत्युत्तरच हवे!

बहार विशेष : साम्राज्यवादी चीनला चोख प्रत्युत्तरच हवे!

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

चिनी सैन्याने तवांगमध्ये कुरापत काढली आहे. काही दिवसांपूर्वी 'एम्स'वर चिनी हॅकर्सनी सायबर हल्ला केला होता. चीन कधीही भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा किंवा सीमावादाचे मुद्दे निकाली काढण्याचा प्रयत्न करणार नाही. याचे मुख्य कारण भारतासोबतचा सीमावाद चीनने जाणीवपूर्वक चिघळता ठेवलेला आहे. चीनला केवळ 'जशास तसे'चीच भाषा कळते. चीनबरोबरच्या संबंधात राजनय किंवा मुत्सद्देगिरी फारशी प्रभावी ठरत नाही. त्यामुळे आपणही चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे.

भारत आणि चीन यांच्यादरम्यान अरुणाचल प्रदेशातील सीमेलगत असणार्‍या तवांग भागातील यांगत्से येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये नुकतीच चकमक झाली. 300 ते 400 सैनिक या भागातून घुसण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, आपल्या पिकेटवरील भारतीय जवान सज्ज होते. त्यामुळे त्यांनी तातडीने चिनी सैनिकांवर हल्ला करून त्यांची पिटाई करण्यास सुरुवात केली. चीनला याची कल्पना होती. त्यामुळे चीनने आणखी काही सैनिक तेथे पाठवले; परंतु भारतानेही आपले अन्य काही जवान तेथे पाठवले आणि चिनी सैनिकांना पिटाळून लावले. चीनचा हा प्रयत्न म्हणजे दोन्ही सैन्यांदरम्यान असलेला 'स्टेटेस्को' बदलण्याचा प्रकार होता. चिनी सैनिकांनी आपल्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला; पण भारताच्या जाँबाज जवानांनी पूर्ण यश मिळवले असून, त्यांना त्यांच्या पोस्टवर परत जाण्यास भाग पाडले. या घटनेनंतर, स्थानिक कमांडरने 11 डिसेंबर रोजी चीनच्या काऊंटर पार्टसोबत व्यवस्थेनुसार ध्वज बैठक (फ्लॅग मिटिंग) घेतली. त्यामध्ये चीनला अशा कारवाईस मनाई करण्यात आली असून, शांतता राखण्यास सांगितले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सीमा लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंडशी संलग्न आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वीच्या काळात चिनी सैनिकांशी भारतीय जवानांच्या झालेल्या झटापटी किंवा चकमकी या लडाखच्या सीमेवर झालेल्या होत्या. 2020 च्या मे महिन्यात कोरोना महामारीचा वैश्विक उद्रेक सुरू असताना झालेली चकमकही ज्या गलवानमध्ये झाली तो भागही लडाख परगण्यातला होता. परंतु, आताची चकमक ही अरुणाचल प्रदेशच्या भागात झालेली आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, गलवान संघर्षानंतर दोन वर्षे भारत-चीन यांच्यातील सीमा शांत होती; पण आता या नव्या कुरापतीमुळे सीमेवरचा तणाव वाढला आहे. चिनी सैनिक हे तवांगमध्ये पूर्ण तयारीनिशी धावून आले होते. सध्या या भागात प्रचंड हिमवृष्टी होत असते. तापमानाचा पारा शून्याच्या खाली गेलेला असतो. अशा वातावरणात सैनिकांकडून सुरक्षेबाबत काहीशी ढिलाई होऊ शकते, अशी चीनची धारणा होती आणि त्याचा फायदा घेण्याच्या द़ृष्टीनेच रात्रीची वेळ साधून चिनी सैनिकांनी ही चाल खेळली. परंतु, भारतीय जवान सावध होते. तसेच चीनच्या हरकतींवर रडारद्वारे लक्ष ठेवून होते. त्यामुळेच चिनी सैनिकांना पळवून लावण्यात आपल्याला यश आले. विशेष म्हणजे, पळून गेल्यानंतरही चिनी सैनिकांना भारतीय जवान येऊन आपल्यावर हल्ला करतील, अशी भीती होती. त्यामुळेच त्यांनी कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर काही राऊंडस् फायर केले. या चकमकीत चिनी सैनिक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. अनेक चिनी सैनिकांना आपण पकडलेही होते; परंतु त्यांना नंतर सोडण्यात आले.

काही दिवसांपूर्वी बाली येथे झालेल्या जी-20 च्या वार्षिक बैठकीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती. त्यावेळी अनेक तथाकथित तज्ज्ञांनी या भेटीनंतर भारत-चीन संंबंध सुधारतील, असा आशावाद व्यक्त केला होता. तसा आशावाद बाळगण्यास हरकत असण्याचे कारण नाही. परंतु, वास्तव मात्र त्याहून वेगळे आहे. मी नेहमीच असे सांगत आलो आहे की, भारत आणि चीन यांच्यातील संबंध शून्याचा पाढा आहे. आज इतक्या वर्षांनंतरही वास्तव बदललेले नाही. याचे कारण, चीन कधीही भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा किंवा सीमावादाचे मुद्दे निकाली काढण्याचा प्रयत्न करणार नाही. याचे मुख्य कारण भारतासोबतचा सीमावाद चीनने जाणीवपूर्वक चिघळता ठेवलेला आहे.

वास्तविक पाहता, चीनचे अनेक देशांशी सीमावाद असून, यापैकी बहुतांश देशांबरोबरचे सीमावाद चीनने आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर सोडवलेले आहेत. मात्र, भारत आणि भूतान या दोन देशांबरोबरचा सीमावाद मात्र आजही सुटलेला नाही. किंबहुना, यासाठी चीनची तयारीच नाहीये. कारण, या सीमावादाआडून चीनला सातत्याने भारतावर दबाव टाकायचा आहे. आता प्रश्न उरतो तो चीनला या दबावातून काय साध्य करायचे आहे? याचे उत्तर म्हणजे, चीनला यातून ते म्हणतील त्या भूभागापर्यंतचा हक्क हवा आहे. थोडक्यात, चीन सांगेल ती सीमारेषा भारताने मान्य करायची, तसा करार करायचा.

आपले हे उद्दिष्ट साध्य व्हावे म्हणून भारताला गुडघे टेकायला भाग पाडण्यासाठी चीन सातत्याने सीमेवर कुरघोड्या करत असतो, कुरापती काढत असतो. किंबहुना, या कुरापती म्हणजे एकप्रकारचा इशाराच असतो. पूर्व लडाखमध्ये आपण याचा प्रत्यय घेतलेला आहे. कमांडर पातळीवरील चर्चेच्या 17 फेर्‍या होऊनही चीनने याबाबत सामंजस्याचा किंवा समझोत्याचा मार्ग काढण्यास तयारी दर्शवलेली नाही. ही चीनची सुनियोजित रणनीती आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेच्या आधी काही दिवस चिनी सैन्य काही प्रमाणात मागे जाण्यास तयार असल्याची बातमी आली होती. त्यावेळीही अनेकांंना आता लडाखच्या सीमेवरचा तणाव निवळेल, असे वाटले होते; परंतु तसे झाले नाही.

मागील आठवड्यामध्ये एक महत्त्वाची बातमी आली होती. त्यानुसार देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची संस्था असणार्‍या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात 'एम्स'वर चिनी हॅकर्सनी सायबर हल्ला केला होता आणि यामुळे दहा दिवस हे हॉस्पिटल बंद पडले होते. लाखो रुग्णांंच्या वैद्यकीय माहितीवर (मेडिकल रेकॉर्ड) चिनी हॅकर्सनी डल्ला मारल्यामुळे अनेक रुग्णांना वैद्यकीय उपचार घेता आले नाहीत. कारण, त्यांच्या वैद्यकीय इतिहासाविषयीची माहितीच उपलब्ध नसल्यामुळे उपचार करणेच शक्य नव्हते. वास्तविक हा काही चीनने केलेला पहिला सायबर हल्ला नव्हता. यापूर्वीही अनेकदा चीनने भारतीय संस्थांवर, नागरिकांवर सायबर हल्ले केलेले आहेत. हे लक्षात घेऊन भारतानेही आता सायबर डोमेनमध्ये चीनवर अशा प्रकारचे सायबर हल्ले करण्याची क्षमता विकसित करण्याची वेळ आली आहे.

मएम्सफवरील सायबर हल्ल्यानंतर काही दिवसांतच चीनने तवांगमध्ये ही कुरघोडी केली आहे. अनेकांना माहीत नसेल, पण भारत-चीन सीमेवर शस्रांचा वापर केला जात नाही. भारत-पाकिस्तान सीमेवर जेव्हा सैनिकांमध्ये झटापट होते तेव्हा शस्रास्रांचा वापर केला जातो; परंतु या सीमेवर शस्रे वापरली जात नाहीत. चीनी सैनिक कुठले तरी जुने सुरे, तलवारी घेऊन येतात. आपले सैनिकही काठ्या वगैरेंचा उपयोग करतात. परंतु रायफल्स, लाईट मशिन गन, मीडियम मशिन गन यांच्यासारख्या संहारक शस्रांचा वापर या सीमेवर केला जात नाही. त्याचाच फायदा घेत चीन कुरापती काढत असतो.

परंतु गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारची झटापट झालेली नसताना आता अचानक किंवा एकाएकीपणाने चीनी सैनिकांनी अतिक्रमण केले आहे. यामागचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये अंतर्गत असंतोषाचे वारे वहात आहेत. काही आठवड्यांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना तिसर्‍या टर्मसाठी मुदतवाढ देण्यात आली. माओ त्से तुंग यांच्यानंतर सर्वाधिक काळ चीनचे राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. परंतु चीनी जनतेच्या मनात साम्यवादी पक्षाविरोधात आणि जिनपिंग यांच्या विरोधात नाराजी आहे. विशेषतः गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्ये कोविडवर नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या मझिरो कोविड पॉलिसीफ विरोधात चीनी जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे.

लॉकडाऊनच्या निर्बंधांनी वैतागलेल्या चीनी जनतेच्या असंतोषाचा भडका काही दिवसांपूर्वी उडालेला दिसून आला. चीनच्या प्रमुख शहरांमधून हजारो लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करताना दिसले. त्यांच्या हातामध्ये जिनपिंग यांच्या विरोधातीज निषेधाचे पोस्टर्स होते. चीनमध्ये पेटलेल्या या जनआंदोलनाची दखल जगभरातील माध्यमांकडून घेतली गेली. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेच्या मुद्दयावरुन चीनी जनतेसह संपूर्ण जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी चीनने तवांगमध्ये कुरापत काढलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या काळातही चीनकडून अशा प्रकारची लुटुपुटुची लढाई सुरूच ठेवली जाईल. त्याला आपण वेळोवेळी त्यांची पिटाई करुन, त्यांच्याशी झटापट करून कणखर प्रत्युत्तर द्यावेच लागेल. ज्या-ज्यापद्धतीने ते आपल्याला त्रास देतील त्या-त्या पद्धतीने आपण त्यांना उत्तर दिले पाहिजे. उदाहरणार्थ, चीन जर भारताची कोंडी करण्यासाठी पाकिस्तानला हाताशी धरत असेल, मदत करत असेल तर आपण जपान आणि व्हिएतनामला मदत देऊन चीनला तडाखा दिला पाहिजे.

चीनने भारतातील माओवाद्यांना मदत केली तर आपण शिनशियाँगमधील उइघूर मुस्लिमांना मदत केली पाहिजे. कारण चीनला केवळ आणि केवळ जशास तसेफची भाषाच कळते. चीनी संबंधांमध्ये मुत्सद्देगिरीचा किंवा राजनयाचा फारसा वापर होऊ शकत नाही. चीनला ताकदीची भाषाच कळते. त्यामुळे त्याच भाषेत चीनला उत्तर दिले पाहिजे. भारताने तिबेट आणि तैवानबाबत आपली भूमिका बदलून चीनची कोंडी करण्याच्या दिशेने वळवली पाहिजे. त्याचबरोबर देशातील राजकीय नेतृत्वांनीही एकजूट दाखवण्याची गरज आहे. चीनच्या कुरघोड्यांनंतर दरवेळी सरकारची कोंडी करण्याचा किंवा सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हिताचा नाही.

तवांगच का?

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागावरून चीन आणि भारतामध्ये असणारा तणाव 16 वर्षांपासून चालत आलेला आहे. चीनला काहीही करून तवांगवर कब्जा मिळवायचा आहे. समुद्रसपाटीपासून 17 हजार किलोमीटर उंचीवर असणारा तवांग हा प्रदेश तिबेट, भूतान आणि भारताला जोडणारा आहे. ही भौगोलिकता सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाची आहे, हे चीन जाणून आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी नेपाळ-तिबेट सीमेवरच्या चंबा घाटीनंतर दुसरा मार्ग तवांगमधूनच आहे. त्यामुळे चीनची या भागावर करडी नजर राहिली आहे. तसेच तिबेटवर कब्जा मिळवण्यासाठी आणि आपली अधिकारशाही तिथे गाजवता यावी, यासाठीही चीनला तवांग महत्त्वाचा वाटतो. त्यामुळेच भारताकडून या भागात नेहमीच सुरक्षेसंदर्भात कसलीही कसूर ठेवली जात नाही. ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात अरुणाचल प्रदेशातील सीमारेषेचा मुद्दा निकाली काढण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला तेव्हा चीनने त्यावर स्वाक्षरी केली नव्हती. कारण, तवांग हा आमचाच प्रदेश आहे, असा चीनचा दावा राहिला आहे. 1962 च्या युद्धात चीनने तवांगवर कब्जा केला होता; पण शस्त्रसंधीनंतर या भागातून त्याने माघार घेतली.

सलामी स्लायसिंग

चीन भारताविरुद्ध नेहमीच वेगळ्या प्रकारचे डावपेच वापरत आला आहे. दिवंगत जनरल बिपीन रावत यांनी त्याला 'सलामी स्लायसिंग' असे म्हटले होते. याचा अर्थ थोडे थोडे पुढे सरकत राहणे. भारत-चीन सीमेवर प्रत्येक ठिकाणी सैनिक तैनात करणे शक्य नाही. तसेच ही सीमा आखून किंवा कुंपण घालून निर्धारित केलेलीही नाही. मुळात या सीमेबाबत वाद आहे. याचा फायदा घेत चिनी सैनिक थोडे थोडे अंतर भारताच्या दिशेने सरकण्याचा प्रयत्न करत राहतात. 20 वर्षांपूर्वीच चीनने भारताच्या सीमेपर्यंत रस्त्यांचा विकास केला आहे. आपण गेल्या सात-आठ वर्षांत चीनच्या सीमेकेडे लक्ष दिले आहे; पण चीनप्रमाणे रस्ते विकसित होण्यास भारताला आणखी दोन-तीन वर्षे लागतील. रस्त्यांची सुविधा सुयोग्य असेल; तर चिनी घुसखोरीला उत्तर देण्यासाठी काही तासांत आपले सैनिक पोहोचू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे चीनच्या वाढत्या कुरापतींचा अंदाज घेऊन सीमाभागातील रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने व्हायला हवा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news