हैदराबाद : जगभरात जितकी धार्मिक स्थळे आहेत, तेथे जाणार्या बहुतांशी श्रद्धाळूंच्या मनात काही ना काही नवस किंवा मागणे असते. तेथे ते प्रार्थना करतात. यातील कोणाला मनासारखी नोकरी हवी असते, तर कोणाला आयुष्याची जोडीदार. कोणाला उत्तम आरोग्य हवे असते, तर कोणाला धनसंपदा. मात्र भारतात एक मंदिर असेही आहे, जेथे लोक चक्क देवाकडे आपल्याला व्हिसा मिळावा, हे मागणे घेऊन जातात. येथे देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर व्हिसा लवकर मिळतो, असे मानले जाते आणि म्हणूनच या मंदिराला विदेशात जाण्याचे तिकीट, असे मानण्याची पद्धत रुजली आहे.
हैदराबादमधील चिलकूर बालाजीचे प्रसिद्ध मंदिर यासाठीच प्रसिद्ध आहे. ज्या लोकांना व्हिसा मिळण्यात अडचणी असतात किंवा ज्यांना सत्वर व्हिसा हवा असतो, असे लोक या मंदिरात येऊन व्हिसासाठी देवाकडे प्रार्थना करतात. विशेषत: अमेरिकन व्हिसा मिळवणे अधिक आव्हानात्मक मानले जाते. साहजिकच, या मंदिरातही अमेरिकन व्हिसासाठी प्रयत्न करणारे लोक अधिक संख्येने येतात, असा पूर्वानुभव आहे.
हे मंदिर जवळपास 500 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. जे लोक येथे येतात, ते देवाला 11 प्रदक्षिणा घालतात आणि या प्रदक्षिणेदरम्यानच ते आपली इच्छा देवाकडे मांडतात. आश्चर्य म्हणजे पूजेच्या वेळी ते आपला पासपोर्टदेखील देवासमोर ठेवतात. आता व्हिसा मिळाल्यानंतर या मंदिरात पुन्हा एकदा यावे लागते आणि यावेळी 11 नव्हे, तर 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात. याचमुळे या मंदिराला व्हिसा बालाजी मंदिर असेही ओळखले जाऊ लागले आहे.
या मंदिराला व्हिसाची परंपरा केव्हा सुरू झाली? असा प्रश्न साहजिकच पडेल. झाले असे की, एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पथकाला अमेरिकेला जायचे होते; पण व्हिसा मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यावेळी त्यांनी या मंदिरात येऊन प्रार्थना केली. त्यानंतर त्यांना झटपट व्हिसाही मिळाला आणि त्यानंतर या मंदिराकडे व्हिसासाठी प्रयत्न करणार्या भक्तांची जणू रांगच लागत गेली!