तेल अवीव/वॉशिंग्टन : हमासविरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर इस्रायलने जमिनीवरील आक्रमणानंतर हमासची जवळपास 2 हजार 500 ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. ताज्या हल्ल्यात जबालिया शरणार्थी शिबिरातील मुख्य पाणीपुरवठा स्थानक होत्याचे नव्हते झाले आहे. इस्रायलने गाझातील अल अझर विद्यापीठावरही हल्ला चढविला. विद्यापीठातही हमासचा तळ असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.
हमासकडूनही मध्य इस्रायलवर अनेक रॉकेट डागण्यात आले. यादरम्यान लोकांची एकच धावपळ उडाली. आयर्न डोमच्या मदतीने हमासचे सर्व रॉकेटहल्ले निष्प्रभ करण्यात आल्याचे इस्रायली लष्कराकडून रविवारी सांगण्यात आले.
वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसजवळील फ्रीडम प्लाझात सुमारे 10 हजार मुस्लिमांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ व इस्रायलच्या विरोधात निदर्शने केली. काही वक्त्यांनी, इस्रायलविरोधात जगातील सर्व मुस्लिमांनी एकवटावे व इंतिफादा (संघर्ष) करावा, अशी आवाहनेही केली.
'अल जझिरा' वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गाझामध्ये इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांमुळे दर तासाला 15 लोकांचा मृत्यू होत आहे. दर 15 मृतांमध्ये किमान 6 मुले असतात. दर तासाला 12 इमारती उद्ध्वस्त होत आहेत. अल जझिराने गाझा आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने इस्रायलच्या हल्ल्यांमुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगार्यात गाझात 2 हजार 200 लोक दबलेले आहेत. त्यात 1 हजार 250 मुले आहेत. इस्रायली लष्कर मशिदींवरही हल्ले करत असल्याचे या वृत्तात म्हटलेले आहे. दुसरीकडे, जीव वाचवायला गाझामध्ये आता एकही सुरक्षित जागा उरलेली नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.
लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायली लष्कराच्या 6 चौक्यांवर हल्ला केला. इस्रायली सैन्यानेही प्रत्युत्तर दिले आहे.
गाझातील सामान्य नागरिकांच्या कथित असुरक्षिततेबाबत संयुक्त राष्ट्रांच्या वक्तव्याला इस्रायली सैन्याने हरकत घेतली असून, उत्तर गाझामध्ये हल्ले सुरू असले, तरी आम्ही स्वत: दक्षिण गाझामध्ये मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पोहोचवत आहोत, असे म्हटले आहे. नागरिकांना आम्ही आधीच उत्तर गाझा सोडण्याचा इशारा दिलेला होता, असे सांगून, दक्षिण गाझातील सुरक्षितता पाहून 'हमास'चा कोणीही सैनिक इथे पोहोचला तर त्याला आम्ही थेट ठार करत आहोत, हेही सैन्याने स्पष्ट केले आहे.