पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel vs Pakistan : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 7 विकेट्स राखून पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाच्या या शानदार विजयाची नोंद थेट इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी घेतली आहे. त्यांनी भारताच्या विजयावर आनंद व्यक्त केला असून पाकिस्तान संघाला टोला हाणला आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरून एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इस्रायलचे राजदूत गिलन म्हणतात की, 'क्रिकेट वर्ल्डकपच्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव झाला आहे. त्यामुळे ते आपला विजय हमास दहशतवाद्यांना समर्पित करू शकले नाहीत याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या भारतीय मित्रांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताचे पंतप्रधान आणि इस्रायली पंतप्रधान यांच्या एकतेचे पोस्टर झळकावले. ही एकात्मकता पाहून आम्ही खूप खूश आहे,' असे त्यांनी म्हटले आहे. (Israel vs Pakistan)
पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानने (Muhammad Rizwan) याने विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेवरील पाकिस्तानच्या मोठ्या विजयानंतर इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर भाष्य केले होते.
हैदराबादमध्ये झालेल्या त्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 344 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 48.2 षटकांत चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. रिझवानने 131 धावांची नाबाद खेळी केली होती. या सामन्यानंतर रिझवानने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली. यामध्ये त्याने म्हटले होते की, 'श्रीलंकेवरील पाकिस्तानचा विजय हा गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. संपूर्ण टीमला आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अलीला श्रेय देतो की त्यांनी ते सोपे केले. हैदराबादच्या लोकांचे अद्भुत स्वागत आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.' (Israel vs Pakistan)
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे एकदिवसीय विश्वचषक सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाला भारतीय गोलंदाजांनी केवळ 191 धावांत गुंडाळले. 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची कर्णधार खेळी केली, ज्याच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला.