पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ हमास-इस्रायलमध्ये संघर्ष पेटला आहे. दरम्यान, हमास आणि इस्रायल यांच्यात ओलिस करार होणार असल्याचे समोर आले आहे. तसेच इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांनी हा करार होत असला तरी युद्धविराम नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान ७ ऑक्टोंबरपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १४ हजार ८५४ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ५ हजार ८५० मुलांचा समावेश असल्याचे हमासच्या आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.
इस्रायल-हमासमध्ये हवाई हल्ल्यापाठोपाठ जमिनीवरूनही हल्ला सुरूच आहे. त्यामुळे सध्याची येथील परिस्थिती समजून घेणे. तसेच आकडेवारी मिळवणे एक आव्हानात्मक काम बनले आहे. दरम्यान गाझा पट्टीतील आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितनुसार, इस्रायल हमास युद्धात आतापर्यंत १२ हजार ७०० पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूची नोद करण्यात आली आहे, असे देखील 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ४७ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आज संपुष्टात येणार आहे. शुक्रवार म्हणजेच आज इस्रायल आणि पॅलेस्टिनी इस्लामिक गट हमास यांच्यात चार दिवसांच्या युद्धविरामाची सुरुवात होणार आहे. या युद्धबंदीबाबत कतार मध्यस्थी करणार असल्याचे देखील माध्यमांनी स्पष्ट केले आहे. कतार मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल-अन्सारी यांनी दोहा येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, हमासकडे ओलिस असलेले ५० इस्रायली ओलीस आज(दि.२४) सोडले जातील. पॅलेस्टिनींना इस्रायली तुरुंगातून मुक्त केले जाईल आणि या युद्धविरामामुळे युद्ध कायमचे थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा असल्याचे देखील कतार मंत्रालयाने म्हटले आहे.