इराक श्रीलंकेच्‍या वाटेवर : शिया धर्मगुरु समर्थकांची राष्‍ट्रपती भवनात घुसखोरी, हिंसाचारात १५ ठार

शिया धर्मगुरु मुक्‍तदा अल-सदर यांनी राजकीय संन्‍यासची घोषणा केली.  यानंतर त्‍यांचे समर्थक रस्‍त्‍यावर उतरले आहेत.
शिया धर्मगुरु मुक्‍तदा अल-सदर यांनी राजकीय संन्‍यासची घोषणा केली. यानंतर त्‍यांचे समर्थक रस्‍त्‍यावर उतरले आहेत.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : श्रीलंकेनंतर आता इराकमध्‍ये राजकीय अस्‍थिरतेमुळे हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. शिया धर्मगुरु मुक्‍तदा अल-सदर यांनी राजकीय संन्‍यासची घोषणा केली. यानंतर त्‍यांचे समर्थक बिथरले आहेत. अल-सदर यांच्‍या समर्थकांनी राष्‍ट्रपती भवनात घुसखोरी केली असून, त्‍यांच्‍यात आणि इराण सर्मथक इराकी नागरिकांमध्‍ये रस्‍त्‍यावरील संघर्ष सुरु झाला आहे. आंदोलक आणि पोलीसांमधील धुमश्‍चक्रीमुळे राजधानी बगदादमध्‍ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, हिंसाचारात आतापर्यंत १५ नागरिक ठार तर १९ हून अधिक जण जखमी झाल्‍याचे वृत्त आहे.

शिया धर्मगुरुंच्‍या राजकीय संन्‍याच्‍या घोषणेनंतर गदारोळ

शिया धर्मगुरु मुक्‍तदा अल-सदर यांनी सोमवारी ( दि. २९) राजकीय संन्‍यासची घोषणा केली. यानंतर त्‍यांचे समर्थक राजधानी बगदादमध्‍ये रस्‍त्‍यावर उतरले. श्रीलंकेमध्‍ये राष्‍ट्रपतींनी राजीनामा दिल्‍यानंतर नागरिकांनी राष्‍ट्रपती निवासस्‍थान ताब्‍यात घेतले होते. याच पद्‍धतीने अल-सदर यांच्‍या समर्थकांनी इराक राष्‍ट्रपती भवन आणि काही सरकारी कार्यालय ताब्‍यात घेतली आहेत. या समर्थकांना हिसकावून लावण्‍यात सुरक्षा दल अपयशी ठरत आहे. रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या नागिरांनाी राष्‍ट्रपती भवनमधील स्‍विमिंग पूलमध्‍ये पोहण्‍याचा आनंद लुटला. हे सर्व अल-सदर यांचे समर्थक असल्‍याचे सांगितले जात आहे.

इराक श्रीलंकेच्‍या वाटेवर : बगदादमध्‍ये हिंसाचार

अल-सदर यांच्‍या समर्थकांनी बगदादच्‍या ग्रीन झोनमध्‍ये धरणे आंदोलन सुरु केले आहे. लष्‍कर आणि पोलिसांनी आंदोलकांना ग्रीन झोन परिसर सोडण्‍याची आवाहन केले होते. मात्र ते धुडकावत आंदोलन सुरुच राहिल्‍याने परिस्‍थिती आणखी चिघळली. आंदोलक आणि पोलीस यांच्‍यात धुमश्‍चक्री उडाली. शिया धर्मगुरु अल-सदर आणि इराण सर्मथक इराकी नागरिक आमने-सामने आले. बगदादमधील रस्‍त्‍यांवर दगडफेकीच्‍या घटना घडल्‍या. गोळीबारात १५ नागरिक ठार झाले आहेत. तर १९ हून अधिक जण जखमी झाले आहे. हिंसाचारग्रस्‍त भागात संचारबंदी लागू केली आहे.

इराक श्रीलंकेच्‍या वाटेवर! : राजकीय संघर्ष तीव्र होण्‍याची शक्‍यता

इराकच्‍या राजकारणावरील आमेरिका आणि इराणचा प्रभाव कमी व्‍हावा यासाठी शिया धर्मगुरु मुक्‍तदा अल-सदर प्रयत्‍नशील होते. संसद बरखास्‍त करुन देशात निवडणुका घेण्‍यात याव्‍यात, अशी मागणी त्‍यांनी केली होती. मात्र त्‍यांनी अचानक २९ ऑगस्‍ट रोजी राजकारणातून संन्‍यास घेत असल्‍याचे ट्वीट केले. या घोषणेमुळे त्‍यांचे समर्थक रस्‍त्‍यावर उतरले आहेत. ऑक्‍टोबर २०२१मध्‍ये इराकमध्‍ये निवडणुका झाल्‍या होत्‍या. यावेळी अल-सदर यांच्‍या पक्षाला ३२९ पैकी ७३ जागा मिळाल्‍या होत्‍या. मात्र त्‍यांनी अन्‍य पक्षांबरोबर आघाडी करण्‍यास नकार दिला. इराकमध्‍ये सध्‍या मुस्‍तफा अल-कदीमी पंतप्रधान आहेत. आता अल-सदर हे आपली पुढील भूमिका स्‍पष्‍ट करेपर्यंत देशातील राजकीय पेच कायम राहिल, असे मानले जात आहे. तसेच राजकीय संघर्ष अधिक तीव्र होईल, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news