पुढारी ऑनलाइन डेस्क : Iran Hijab Protest : तेहरान: वृत्तसंस्था, हिजाबवरून पेटलेल्या इराणचे आंदोलन आता आणखी भडकले आहे. इराणला कट्टर इस्लामी इराण बनवणारे दिवंगत सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांचे जन्मघर आंदोलकांनी पेटवून दिले. या जाळपोळीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इराणमधील आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.
Iran Hijab Protest : १९७९ साली शाह महम्मद रझा पहलवी यांची सत्ता उलथवून टाकत अयातुल्ला खोमेनी यांनी ताबा मिळवत इराणला इस्लामी प्रजासत्ताक जाहीर करत कठोर इस्लामी निर्बंध अंमलात आणले. खोमेन या प्रांतात अयातुल्ला खोमेनी यांचा जन्म झाला होता. खोमेनी हे इमाम ते इराणचे सर्वोच्च धर्मगुरू व राष्ट्रप्रमुख राहिले. त्यांचे खोमेन शहरातील घर बुधवारी सरकारविरोधी आंदोलकांनी पेटवून दिले.
Iran Hijab Protest : खोमेनी यांच्या निधनानंतर तेथे वस्तुसंग्रहालय करण्यात आले आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात आंदोलकांचा एक जमाव घरावर चाल करून जाताना दिसत आहे. त्यानंतर घराची तोडफोड करून हे घर पेटवण्यात आले. या व्हिडिओची खातरजमा अनेक वृत्तसंस्थांनी केली असून, तो असल्याचे सत्य पडताळणीत समोर आले आहे.
Iran Hijab Protest : दुसरीकडे, इराण सरकारने असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगत घटनाच नाकारली आहे. मात्र, महासा आमीन या तरुणीने हिजाब नीट घातला नाही म्हणून तिला अटक करण्यात आली होती, कोठडीत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये गेल्या तीन महिन्यांत आंदोलनाचा भडका उडाला असून, महिलांनी त्यात पुढाकार घेत हिजाब भिरकावत आपला रोष व्यक्त केला आहे.
Iran Hijab Protest : तेहरानसह इराणच्या बहुतांश शहरांत आंदोलन भडकले असून, जगभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. दिवसागणिक आंदोलन तीव्र होत असून, मागच्याच आठवड्यात अटक केलेल्या एका आंदोलकाला इराणने मृत्युदंड दिला होता. त्यामुळे आंदोलकांच्या रागात आणखीच भर पडली आहे.
हे ही वाचा :