क्रीडा : वादाचा नवा केंद्रबिंदू… आयपीएल की रणजी?

क्रीडा : वादाचा नवा केंद्रबिंदू… आयपीएल की रणजी?

एक काळ असाही होता, ज्यावेळी आयपीएल सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय संघाचा दरवाजा ठोठावण्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे रणजी क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवण्याचा; पण आयपीएल आले आणि जवळपास या सर्व समीकरणांची चांगलीच उलथापालथ झाली. रणजीपेक्षा आयपीएलमधील कामगिरीला महत्त्व देण्याची अलिखित परंपरा याचवेळी सुरू झाली. इशान किशनने रणजी टाळून आयपीएलला प्राधान्य देण्याचे निमित्त झाले आणि यामुळे आयपीएल की रणजी? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गतवर्षी जुलैमधील एका मुलाखतीत इशान किशन सांगत होता, 'मी म र्यादित षटकांचे क्रिकेट खेळत होतो, त्यावेळी माझे वडील मला सातत्याने सांगायचे की, कसोटी क्रिकेट हेच मूळ क्रिकेट आहे आणि त्याकडे तू अजिबात दुर्लक्ष होऊ देऊ नकोस. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या सर्व कौशल्यांची पारख होते आणि तिथेच खराखुरा फलंदाज घडतो.'

नेमके वडिलांच्या याच सल्ल्याचा इशान किशनला अगदी सोयीस्कर विसर पडलेला दिसून येतो. इशान खरं तर युवा खेळाडूंच्या फळीतील आश्वासक खेळाडूंपैकी एक. झारखंडनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारा दुसरा खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनीनंतर त्याचेच नाव घेतले जाते. धोनीप्रमाणेच इशानही उत्तम यष्टिरक्षक-फलंदाज. भले धोनीची यष्टिरक्षणातील गुणवत्ता त्याच्याकडे नसेल; पण त्याचा स्ट्रोक प्ले प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चिरफाड करण्यासाठी सक्षम आहे, हे पदोपदी जाणवते.

2005 मध्ये इशान क्रिकेटमध्ये स्वत:ला आजमावत होता, त्यावेळी त्याचे स्थानिक प्रशिक्षक उत्तम मजुमदार यांनी इशानच्या पालकांना आवर्जून सांगितले होते, 'कुछ भी करना, इस लडके का क्रिकेट बंद मत करना!' इशानच्या पालकांनी ती सूचना तंतोतंत पाळली. इशान अपेक्षेप्रमाणे नावारूपास आला. अर्थात, पॉकेट डायनामो नावाने ओळखल्या जाणारा हा खेळाडू मागील आठवड्यात मात्र वादाच्या भोवर्‍यात सापडला आणि यासाठी निमित्त ठरले ते त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटकडे दुर्लक्ष करत आयपीएल सरावाला दिलेले प्राधान्य.

इशानने प्रथमश्रेणी क्रिकेट न खेळता फक्त आयपीएलवर लक्ष केंद्रित करण्याचा परस्पर निर्णय घेतला आणि यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवे नाट्य सुरू झाले. बीसीसीआय पदाधिकार्‍यांनी इशान किशनला राजस्थानविरुद्ध जमशेदपूरमध्ये होणार्‍या रणजी सामन्यात सहभागी होण्याची पूर्वसूचना दिली आहे, अशी चर्चा यावेळी सुरू झाली आणि आयपीएलसाठी रणजी टाळणार्‍या खेळाडूंना एकप्रकारे ही चपराकच मानली गेली. याचमुळे आता वेळ अशीही आली आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी रणजी चषक स्पर्धेतील काही सामने खेळण्याची सक्ती करेल आणि जेणेकरून राष्ट्रीय संघातील सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा प्रथमश्रेणी क्रिकेटकडे वळावे लागेल.

यापूर्वी इशान किशन दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या मध्यातूनच मायदेशी परतला आणि त्यानंतर त्याने एकही सामना खेळण्याचे औचित्य दाखवले नाही. इतके कमी की काय म्हणून तो मुंबई इंडियन्सचा नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंड्यासह मुंबई इंडियन्सतर्फे आयपीएल सरावात मश्गूल दिसून आला आणि इथे बीसीसीआयचे पित्त खवळले नसते तरच नवल होते! योगायोग म्हणजे नेमके याचवेळी झारखंडचा संघ रणजीमध्ये अडचणीत होता आणि इशान किशनला याचा मात्र जणू सोयीस्कर विसर पडला.

इशान किशन दक्षिण आफ्रिका दौर्‍याच्या निम्म्यातून परतल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेत खेळला नाही आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी त्याचा विचार केला गेला नाही. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्टपणे म्हटले की, इशानची थेट निवड होणार नाही. राष्ट्रीय संघात निवडीसाठी त्याला थोडेफार प्रथमश्रेणी क्रिकेट खेळावेच लागेल.

द्रविड यांचा इशारा स्पष्ट होता. तो म्हणजे इशान किशनने रणजी क्रिकेट खेळावे; पण आपल्याच दुनियेत मश्गूल असणार्‍या इशान किशनने तो सल्लाही धुडकावण्याचे धारिष्ट्य दाखवले! तो पंड्या बंधूंसह आयपीएल सरावासाठी बडोद्यात दिसून आला. आता या आगळिकीनंतर त्याचे संतप्त पडसाद उमटणार, हे साहजिकच होते. झालेही तसेच. बीसीसीआयने राष्ट्रीय संघाबाहेर असलेल्या सर्व खेळाडूंसाठी थेट फर्मान काढले आणि वाळल्याबरोबर ओलेही जळते, या न्यायाने इशान किशनबरोबरच कृणाल पंड्या, दीपक चहर, अगदी श्रेयस अय्यर या सार्‍याच खेळाडूंना हा नियम पाळणे आता बंधनकारक ठरते आहे.

मुळातच आजची परिस्थिती अशी आहे की, काही खेळाडूंना प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणेच पसंत असत नाही, याची आता बीसीसीआयलाही उत्तम जाणीव आहे. याचमुळे या प्रणालीत बदलाचे वारे वाहू लागले, ही बाब स्वागतार्हच.

हार्दिक पंड्याही स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणे टाळतो; पण त्याचे शरीर मर्यादित षटकांच्या पलीकडील क्रिकेट खेळण्याइतपत तंदुरुस्त नाही, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आयसीसी स्पर्धांसाठी तो उपलब्ध असणेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याने त्याला यातून कळत नकळत सूट मिळते.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मुळातच करड्या शिस्तीचे. ते स्वत: आजही कमालीची शिस्त पाळतात आणि खेळाडूंकडूनही तीच अपेक्षा ते ठेवत असतील तर यात गैर काहीच नाही. संघाची सध्याची जडणघडण पाहता कृणाल पंड्या, दीपक चहरसारखे खेळाडू कसोटीच्या 'स्कीम ऑफ द थिंग्ज'मध्ये समाविष्ट नाहीत आणि इंग्लंडविरुद्ध श्रेयसला शेवटच्या तीन कसोटींतून वगळले गेले असल्याने त्यालाही बीसीसीआयचे नवे फर्मान पाळावेच लागेल, हे सूर्यप्रकाशाइतके सुस्पष्ट आहे.

चर्चेची ही सर्व धूळ खाली बसेतोवर एक बाब निश्चित आहे. इशान किशनला आता एक तरी बीसीसीआयच्या सूचनेनुसार प्रथमश्रेणी क्रिकेट खेळून राष्ट्रीय संघात परतावे लागेल आणि यास तो राजी नसेल, तर त्याला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला आणि पर्यायाने आयपीएल कारकिर्दीला रामराम करावा लागेल. ही बाब त्याला या वळणावर तरी पचेल असे दिसत नाही; पण जे काही निर्णय घेतले जातील आणि अंमलात आणले जातील, त्यामुळे भारतीय क्रिकेटची भविष्यातील दिशा मात्र सुनिश्चित होणार आहे.

इशान किशनमध्ये इतके धारिष्ट्य आले कुठून?

दस्तुरखुद्द मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेटपणे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याची सूचना केली असतानाही ती धुडकावून लावण्याइतके धारिष्ट्य इशान किशनमध्ये आले कुठून, हा प्रश्न साहजिकच उपस्थित होईल; पण सध्या परिस्थिती अशी आहे की, के. एस. भरत फॉर्मसाठी झगडत आहे आणि रिषभ पंत अद्यापही उपलब्ध नाही. यामुळे आपल्यासाठी संघाचे दरवाजे केव्हाही सताड उघडे असतील, अशीच इशानची समजूत झाली असेल तर ते साहजिकच; पण बीसीसीआयचे नवे फर्मान नजरेसमोर ठेवता, कारकीर्द सांभाळायची असेल तर इशान किशनने सबुरीने दोन पावले मागे येण्यातच शहाणपण असणार आहे, हेही नसे थोडके!

इशानचा 'तो' पवित्रा मंडळाला रुचणार का?

द्रविड, बीसीसीआयचा रोष पत्करून इशान किशनने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. शिवाय, काही कालावधीनंतर आपण आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर डी. वाय. पाटील टी-20 स्पर्धेत उतरणार असल्याचा निर्वाळा दिला. मात्र, आपण कोणत्या क्रिकेट प्रकारात खेळणार, हे परस्पर आणि तेही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीर करण्याचा इशानचा हा पवित्रा करड्या शिस्तीच्या मंडळाला रुचणार का, हा खरा प्रश्न असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news