IPL : हैदराबादचे ‘जय हो…’

IPL : हैदराबादचे ‘जय हो...’www.pudhari.news
IPL : हैदराबादचे ‘जय हो...’www.pudhari.news

मुंबई ः वृत्तसंस्था सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला अक्षरशः चिरडले आणि शनिवारी आपल्या पाचव्या दिमाखदार विजयाची नोंद केली. केन विलियम्सनच्या चमूने ही लढत 9 गडी आणि तब्बल बारा षटके राखून आरामात जिंकली. आता सात सामन्यांतून त्यांचे 10 गुण झाले आहेत. आरसीबीचे आठ सामन्यांतून दहा गुण झाले आहेत. आज बेंगलोरला तिसर्‍यांदा पराभवाचे तोंड पाहावे लागले.

विजयासाठी ठेवलेले 69 धावांचे अतिशय सोपे लक्ष्य हैदराबादने 8 षटकांतच पार केले. त्यांचा सलामीवीर अभिषेक शर्माने 47 धावा चोपल्या. त्याने 28 चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व एक गगनभेदी षटकार लगावला. कर्णधार केन विलियम्सन 16 धावांवर नाबाद राहिला. तसेच राहुल त्रिपाठीने नाबाद 7 धावा केल्या. हा सामना एवढा एकतर्फी होईल असे वाटत नव्हते, अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर बोलताना विलियम्सनने व्यक्त केली.

हैदराबादने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजी दिली. मात्र, हैदराबादच्या आग ओकणार्‍या मार्‍यापुढे बेंगलोर संघ 16.1 षटकांत अवघ्या 68 धावांत गारद झाला. बेंगलोरकडून सुयश प्रभुदेसाईने सर्वाधिक म्हणजे 15 धावा केल्या. बाकीचे फलंदाज आले आणि हजेरी लावून तंबूत परतले. सुरुवातीपासून त्यांचा हाच खेळ सुरू राहिला.

कर्णधार फाफ डू प्लेसिस 5, अनुज रावत 0, विराट कोहली 0, ग्लेन मॅक्सवेल 12, शाहबाज अहमद 7, दिनेश कार्तिक 0, हर्षल पटेल 4, वानिंदू हसरंगा 8, जोश हेझलवूड 3 आणि महम्मद सिराज 2 धावांवर बाद झाले. हैदराबादकडून टी. नटराजन आणि मार्को जेन्सन यांनी प्रत्येकी 3 तर जगदीशा सचित, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला. मलिकने तर आपल्या चार षटकांत केवळ 13 धावा दिल्या.

बेंगलोरची नीचांकी धावसंख्या

हैदराबादच्या भेदक मार्‍यापुढे आरसीबीचा संघ आपली नीचांकी धावसंख्येचा विक्रम मोडतो की काय अशी अवस्था झाली होती; पण अतिरिक्त धावसंख्येमुळे ही नामुष्की टळली. शनिवारी आरसीबीचा संघ 68 धावांत गारद झाला. याआधी आरसीबीचा संघ फक्त 49 धावांत बाद झाला होता. त्यानंतर ही दुसरी नीचांकी धावसंख्या आहे. 70 धावसंख्येच्या आत पाचवेळा आरसीबीचा संघ बाद झाला आहे. कोलकाताने आरसीबीचा डाव 2017 मध्ये 49 धावांत संपुष्टात आणला होता. त्यानंतर हैदराबादने शनिवारी त्यांचा 68 धावांत धुव्वा उडवला. 2019 मध्ये चेन्नईने आरसीबीला 70 धावांत बाद केले होते. तसेच 2014 मध्ये राजस्थानने आरसीबीला 70 धावांत तंबूत पाठवले होते.

कोहलीचा धावदुष्काळ सुरूच

विराट कोहली जागतिक किर्तीचा फलंदाज असला तरी यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला धावांसाठी झगडावे लागत आहे. शनिवारी तो हैदराबादविरुद्ध गोल्डन डकवर बाद झाला. या आधी लखनौविरुद्ध तो पहिल्याच चेंडूवर टिपला गेला होता. 2008 ते 2021 या कालावधीतील आयपीएलमध्ये कोहलीच्या नावावर फक्त तीन गोल्डन डक लागले होते. मात्र, यंदा आतापर्यंत तो दोनदा गोल्डन डकवर तंबूत परतला आहे. जेव्हा एखादा फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद होतो तेव्हा क्रिकेटच्या परिभाषेत त्याला 'गोल्डन डक' असे संबोधले जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 41, 12, 5, 48, 1, 12, 0, 0 अशा धावा आठ सामन्यांतून केल्या आहेत.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news