'आयपीएल'चा मिनी लिलाव (IPL Auction 2024) नुकताच दुबई येथे पार पडला. या लिलावात रेकॉर्डब्रेक अशा किमतीमध्ये खेळाडूंची विक्री झाली. या लिलावापूर्वी प्रत्येक फ्रँचायजींनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू न शकलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत रीलिज केले होते. अशाप्रकारे फ्रँचायजींना आपल्या पर्समधील रक्कम वाढवण्यास मदत झाली; पण महत्त्वाचे म्हणजे, रीलिज झालेले हे खेळाडू 'आयपीएल'च्या आगामी हंगामात खेळू शकतील का? त्यांना खरेदीदार मिळेल का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. रीलिज झाल्यामुळे अनेक खेळाडू निराशही झाले होते; पण 'आयपीएल 2024' च्या लिलावात असे अनेक खेळाडू पाहायला मिळाले ज्यांना रीलिज झाल्याचा मोठा फायदा झाला आहे. त्यांच्या मानधनात मागील हंगामाच्या तुलनेत अनेक पटींनी वाढ झाली आहे.
हर्षल पटेल
भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला 2022 च्या लिलावात 'आरसीबी'ने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 2021 च्या हंगामातील पर्पल कॅप विजेत्या हर्षलला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यामुळे फ्रँचायझीने त्याला
रीलिज केले; पण 2023 च्या मिनी लिलावात पंजाब किंग्जने हर्षलला 11.75 कोटी रुपयांना आपल्या संघासोबत जोडले.
रोव्हमन पॉवेल
वेस्ट इंडिजच्या टी-20 संघाचा कर्णधार रॉवमन पॉवेल गेल्या 2023 च्या 'आयपीएल' हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्याला 'डीसी'ने 2.8 कोटी रुपयांना खरेदी केले होते; पण त्याने निराशा केली. पॉवेल फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसला. परिणामी, फ्रँचायझीने त्याला रीलिज केले; पण आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने या उजव्या हाताच्या फलंदाजाला 7.4 कोटी मोजले आहेत.
रिले रुसो
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रुसो हा गेल्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. 4.6 कोटी रुपये किमतीचा हा आक्रमक फलंदाज गेल्या हंगामात अपयशी ठरला. त्याने जगभरातील लीगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली होती; पण त्याला 'आयपीएल 2023' मध्ये चमक दाखवता आली नाही. धावांची अपेक्षा पूर्ण न करता आल्याने रुसोला 'दिल्ली'तून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 2024 च्या हंगामासाठी झालेल्या लिलावात त्याला पहिल्या फेरीतही कोणीही विकत घेतले नाही; पण दिल्लीतून 'सुटका' झालेल्या या खेळाडूला पंजाबने दुसर्या फेरीत चक्क 8 कोटी रुपयांना घेतले.
यश दयाल (IPL Auction 2024)
'केकेआर'च्या रिंकू सिंहने 2023 च्या 'आयपीएल'मध्ये कहर केला. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना यश दयालच्या शेवटच्या षटकातील 5 चेंडूंत 5 षटकार ठोकले. सलग पाच षटकार खाल्ल्याने गोलंदाज यश दयाल हा नैराश्यात गेला. 2024 च्या हंगामापूर्वी गुजरात संघानेही त्याची साथ सोडली. त्यामुळे त्याचे 'आयपीएल' करिअर धोक्यात आले; पण दुबईतील लिलावात विराट कोहलीचा 'आरसीबी' संघ त्याच्यासाठी संकटमोचक ठरली. 'आरसीबी'ने यशला तब्बल 5 कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या हंगामात त्याचे मानधन 3.2 कोटी रुपये होते.
अल्झारी जोसेफ
रीलिज होण्याचा सर्वाधिक फायदा हा वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला झाला. 145 कि.मी. प्रतितास पेक्षा जास्त वेगाने चेंडू फेकणारा हा कॅरेबियन गोलंदाज गेल्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळला. 'जीटी'ने त्याला 2.4 कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, त्याला 2024 च्या हंगामासाठी गुजरातने रीलिज केले; पण 'आरसीबी'ने त्याला 11.5 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले.