IPL 2024 MI vs DC : दिल्लीचाही मुंबई इंडियन्सला ‘दे धक्का’

IPL 2024 MI vs DC : दिल्लीचाही मुंबई इंडियन्सला ‘दे धक्का’
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : युवा फलंदाज जेक फ्रेजर-मॅकगर्कने अवघ्या 27 चेंडूंत 84 धावांची आतषबाजी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने येथील आयपीएल साखळी सामन्यात अडीचशे पार धावसंख्या उभारली आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध 10 धावांनी निसटता विजय प्राप्त केला. या लढतीत दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 257 धावांचा डोंगर रचल्यानंतर मुंबईला 20 षटकांत 9 बाद 247 धावांपर्यंत मजल मारता आली. या लढतीत एकत्रित 504 धावांची आतषबाजी झाली, ते आणखी एक वैशिष्ट्य ठरले.

दिल्लीतर्फे मॅकगर्कने चौफेर फटकेबाजी करत असताना ट्रिस्टियन स्टब्जने डेथ ओव्हर्समध्ये प्रत्येक चेंडूवर तुटून पडत 25 चेंडूंत जलद 48 धावा फटकावल्या आणि याच धावसंख्येवर तो नाबादही राहिला. दिल्ली कॅपिटल्सची ही आयपीएल स्पर्धेतील त्यांची सर्वोच्च धावसंख्याही ठरली आहे. या सामन्यात पुन्हा एकदा दोन्ही संघांनी एकत्रित 500 धावांचा टप्पा सर केला.

या हंगामात दिल्लीतर्फे दुसर्‍यांदा सलामीला फलंदाजीला उतरणार्‍या 22 वर्षीय मॅकगर्कने या हंगामात सर्वात जलद अर्धशतकाच्या आपल्याच विक्रमाशी येथे बरोबरी साधली. त्याने अवघ्या 15 चेंडूंत येथे अर्धशतक फलकावर लावले. मुंबईने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.

मॅकगर्क क्रीझवर असताना तुलनेने छोट्या असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर चौकार-षटकारांची अक्षरश: आतषबाजी झाली. त्याने आपल्या तडफदार खेळीदरम्यान 11 चौकार व 6 षटकार फटकावले. त्याने ल्यूक वूडच्या पहिल्याच षटकात 19 धावा वसूल केल्या होत्या. त्याच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये 92 धावांची मजल मारली होती. वूडऐवजी गोलंदाजीला आलेल्या नुवान तुषारालादेखील मॅकगर्कला रोखण्यात अजिबात यश मिळाले नाही.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने मॅकगर्कचा फॉर्म पाहता पीयूष चावलाला गोलंदाजीला आणत आणखी एक चाल खेळली; पण तरीही मॅकगर्कचा धडाका तसूभरही कमी झाला नाही. उलटपक्षी, लाँगऑनकडे शानदार षटकार फटकावत त्याने आपले तिसरे आयपीएल अर्धशतक अगदी थाटात साजरे केले होते. 300 चा स्ट्राईक राखणार्‍या या फलंदाजाने पंड्याला डीप मिडविकेटवरून उत्तुंग षटकारासाठी भिरकावून दिले, तेही त्याच्या खेळीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.

विजयासाठी 258 धावांचे कडवे आव्हान असताना इशान किशन 20, रोहित शर्मा 8 व सूर्यकुमार यादव 26 हे आघाडीचे तीन फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाल्याने मुंबईची येथेच खरी पीछेहाट झाली. या पडझडीमुळे पॉवर प्लेच्या 6 षटकांअखेर त्यांची 3 बाद 65 अशी स्थिती होती.

पाचव्या स्थानावरील तिलक वर्माने 32 चेंडूंत 4 चौकार, 4 षटकारांसह 63 धावांची आतषबाजी केली, तर कर्णधार हार्दिक पंड्याने 24 चेंडूंत जलद 46 धावांचे योगदान दिले. पंड्याच्या खेळीत 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. शेवटच्या टप्प्यात टीम डेव्हिडने 17 चेंडूंतच 37 धावा फटकावल्या. मात्र, यानंतरही मुंबईला विजयापासून 10 धावांनी वंचित राहावे लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news