पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 KKR vs SRH : हैदराबादविरुद्धच्या रोमांचक सामन्यानंतर केकेआरचा मॅच विनर गोलंदाज हर्षित राणा अडचणीत सापडला. शनिवारच्या सामन्यानंतर बीसीसीआयने त्याला मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावला. हर्षितने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत स्तर 1 चे दोन गुन्हे केले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांसाठी त्याला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के आणि 50 टक्के दंड ठोठावण्यात आला. आचारसंहितेच्या स्तर 1 भंगासाठी सामनाधिका-यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. परिणामी राणानेही दोन गुन्ह्यांची कबुली दिली असून शिक्षा मान्य केली आहे.
वेगवान गोलंदाज हर्षित राणाने एसआरएचच्या डावाच्या सहाव्या षटकात मयंक अग्रवालला बाद केले. या विकेटनंतर हर्षितने मयंकच्या समोर उभा राहत 'फ्लाइंग किस'ची ॲक़्शन करून आक्रमकपणे आनंद साजरा केला. त्याच्या या कृतीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अगदी समालोचक सुनील गावसकर यांनीही असा आनंद साजरा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट सांगितले.
फिल सॉल्ट (54) आणि आंद्रे रसेल (64)च्या वादळी खेळींच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 208 धावा केल्या. प्रत्युत्तरार एसआरएचच्या हेनरिक क्लासेनने स्टार्कची धुलाई करत केकेआरच्या हृदयाचे ठोके वाढवले. क्लासेनने 19व्या षटकात 26 धावा चोपल्या. ज्यामुळे हैदराबादच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. शेवटच्या षटकात सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती. अशावेळी केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने 22 वर्षीय हर्षित राणाकडे चेंडू सोपवला. क्लासेनने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. पण पुढच्या 5 चेंडूत हर्षितने क्लासेन, शाहबाज अहमदच्या विकेट्स घेत केवळ 2 धावा दिल्या आणि केकेआरला सामना जिंकून दिला. झंझावाती खेळीसाठी रसेलला सामनावीराचा किताब देण्यात आला. हर्षितने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले.