पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये सुरू झाला. आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांच्या भाषणाने लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. यानंतर मल्लिका सागर यांनी लिलावाची जबाबदारी घेतली. पहिली बोली वेस्ट इंडिजच्या रोव्हमन पॉवेलवर लावण्यात आली. त्याला राजस्थान रॉयल्सने 7 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला विकत घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात तुंबळ बोली युद्ध झाले. अखेर यात शाहरुख खानच्या केकेआरने बाजी मारली आणि त्याला तब्बल 24.75 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या संघात सामील करून घेतले. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले. डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना खरेदी केले.
बीसीसीआयच्या प्रेस रिलीझनुसार, आयपीएल मिनी लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी त्यांची नावे नोंदवली होती, त्यापैकी 333 नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली. त्यात 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश होता. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले 116 खेळाडू, तर 215 खेळाडू अनकॅप्ड आहेत. दोन खेळाडू सहयोगी देशांचेही आहेत. या लिलावाद्वारे 10 संघात एकूण 77 खेळाडू घेतले जाणार आहेत. (IPL 2024 Auction)
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बोली लढाई सुरू होती. दिल्लीने 9.60 कोटी रुपयांपर्यंत तर मुंबईने 10 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. येथून पुढे गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बोली युद्ध रंगले. अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले.
2018 नंतर, ऑस्ट्रेलियातील त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याने घरी वेळ देण्यास प्राधान्य दिले. तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटला जास्त वेळ देत होता. 2024 मध्ये ऑस्ट्रेलिय संघाला जास्त क्रिकेट खेळावे लागणार नाही. मार्चमध्ये न्यूझीलंड दौरा आणि ऑगस्टच्या उत्तरार्धात अफगाणिस्तान, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेदरम्यान फक्त टी-20 विश्वचषक नियोजित आहे. अशा परिस्थितीत स्टार्कने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टार्कने आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले आहेत. या कालावधीत, या खेळाडूने 20.38 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 7.17 च्या इकॉनॉमी रेटने 34 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 15 धावांत 4 विकेट्स अशी आहे. हा खेळाडू अखेरचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळला होता. 2015 च्या मोसमात, त्याने 13 सामने खेळले आणि 14.55 च्या उत्कृष्ट सरासरीने 20 बळी घेतले.
लिलावात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. गेल्या मोसमात तो गुजरात टायटन्सकडून (जीटी) खेळताना दिसला होता. गेल्या काही वर्षांत त्याने वेस्ट इंडिजकडून खेळताना छाप पाडली आहे. जोसेफने IPL 2023 मध्ये 7 सामने खेळले. यादरम्यान त्याने 32.14 च्या सरासरीने आणि 9.38 च्या इकॉनॉमी रेटने 7 विकेट घेतल्या. अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभूत होऊन त्याचा संघ उपविजेता ठरला होता. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 19 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 28.80 च्या सरासरीने आणि 9.19 च्या इकॉनॉमी रेटने 20 विकेट घेतल्या आहेत. 2019 मध्ये तो पहिल्यांदा या लीगमध्ये खेळताना दिसला होता.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बोली युद्ध झाले. मुंबईने पहिला कमिन्सवर त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपयांपासून बोली लावण्यास सुरुवात केली. त्यांनी 5 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. येथून बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये बोली युद्ध झाले. दोन्ही संघांना कर्णधाराची गरज आहे. चेन्नईने 10 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. बेंगळुरू आणि हैदराबादने 20 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. अखेर हैदराबादने त्याला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले.
न्यूझीलंडचा अष्टपैलू फलंदाज डॅरिल मिशेलसाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बोली युद्ध रंगले. दोन्ही संघांनी 12 ते 13.75 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. अखेरीस चेन्नईने अचानक एन्ट्री घेत मिशेलला 14 कोटींना विकत घेतले.
स्लोअर बॉल स्पेशालिस्ट हर्षल पटेलसाठी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात बोली लढत झाली. गुजरातने 10.75 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली, त्यानंतर लखनौ सुपरजायंट्सने त्यात भाग घेतला. पंजाबने शेवटपर्यंत टिकून राहत हर्षलला 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले. या लिलावात तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र अवघ्या 1.80 कोटी रुपयांना विकला गेला. श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा 1.50 कोटी रुपयांत हैदराबादचा भाग झाला.