पुढारी ऑनलाईन डेस्क : Mumbai Indians in Trouble : आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खराब झाली आहे. एमआयला पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सकडून अवघ्या 6 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांची पुढील लढत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रंगणार आहे. बुधवारी (27 मार्च) हा सामना खेळवला जाणार असून त्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्फोटक फलंदाज आणि टी-20 किंग सूर्यकुमार यादव हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळतान दिसणार नाही.
सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त असून तो सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA)मध्ये उपचार घेत आहे. पहिल्या फिटनेस चाचणीनंतर एनसीएने त्याला क्लीन चिट दिली नाही. याच कारणामुळे तो गुजरात टायटन्सविरुद्धचा पहिला सामना खेळू शकला नाही. त्याचवेळी आता वृत्त येत आहे की, दुसऱ्या फिटनेस चाचणीनंतरही सूर्यकुमार यादवला आयपीएल खेळण्यासाठी क्लीन चिट देण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या अहवालात सूर्याची दुसरी फिटनेस चाचणी 21 मार्च रोजी घेण्यात आली होती. पण, दोन वेळा चाचणी प्रक्रियेतून गेल्यानंतरही त्याला खेळण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की बीसीसीआय 2024 चा टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सुर्याबाबत घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही.
सूर्यकुमार यादव या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान जखमी झाला होता. यानंतर तो जर्मनीला गेला आणि स्पोर्ट्स हर्निया नावाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया करून घेतली. आयपीएल 2024 च्या सुरुवातीपासूनच सूर्या मैदानावर दिसणार अशी अपेक्षा होती, मात्र आतापर्यंत तो मैदानापासून दूर आहे.
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 139 सामन्यांमध्ये 3,249 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 32.17 आणि स्ट्राइक रेट 143.32 राहिला आहे. सूर्याने लीगमध्ये 21 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. गेल्या मोसमात स्कायच्या बॅटला आग लागली होती. त्याने 16 डावात 181 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 605 धावा केल्या.