IPL 2024 : सीएसकेचा विजयी ‘श्रीगणेशा’; सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 6 विकेटस्नी मात

IPL 2024 : सीएसकेचा विजयी ‘श्रीगणेशा’; सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 6 विकेटस्नी मात

चेन्नई; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या पर्वाचा धडाकेबाज प्रारंभ करताना चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर 6 विकेटस्नी धमाकेदार विजय मिळवला. उद्घाटनाच्या लढतीत आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 173 धावा केल्या, हे आव्हान चेन्नईने 18.4 षटकांत पूर्ण केले. सीएसकेकडून सामनावीर मुस्तफिजूर रहमानने 29 धावांत 4 विकेटस् घेत विजयाचा पाया घातला. (IPL 2024)

आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी सुरुवात जलद केली; परंतु त्यांची भागीदारी मोठे स्वरूप घेऊ शकली नाही. यश दयालने ऋतुराजला (15) बाद करून ही जोडी फोडली. पहिलाच आयपीएल सामना खेळणारा रचिन रवींद्र 37 धावांवर कर्ण शर्माची शिकार झाला. अजिंक्य रहाणेने 19 चेेंडूंत 27 धावांची भर घातली. तर डॅरेल मिचेल (22) धावा जोडून परतला. यावेळी चेन्नईला 64 धावांची आवश्यकता होती.

रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे या डावखुर्‍या जोडीने डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी दहाच्या पुढे धावगती नेताना चेन्नईच्या फॅन्सची धकधक कमी केली. दोघांच्या फटकेबाजीमुळे सीएसकेने 8 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला. शिवम दुबेने अल्झारी जोसेफला षटकार आणि चौकार वसूल करून विजयी लक्ष्य गाठले. दुबे (34) तर जडेजा (25) धावांवर नाबाद राहिले. (IPL 2024)

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून कर्णधार फाफ डू फ्लेसिसने स्फोटक खेळी केली. डू फ्लेसिसने दीपक चहरवर हल्ला चढवत चौकार ठोकले. आरसीबीची गाडी सुसाट धावत असताना मुस्तफिजूर रहमानने या गाडीला ब्रेक लावला. डावाच्या 41 धावांवर आरसीबीने कर्णधाराच्या रूपात आपला पहिला गडी गमावला. डू फ्लेसिसने 8 चौकारांसह 35 धावा केल्या. त्यानंतर त्याच षटकात रजत पाटीदार एकही धाव न करता तंबूत परतला. पुढच्या षटकात दीपक चहरने ग्लेन मॅक्सवेल (0) आणि मुस्तफिजूरने कॅमेरून ग्रीनला (18) आपल्या जाळ्यात फसवले. विराट कोहलीने संथ खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वाटेत अजिंक्य रहाणे आला. मुस्तफिजूरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या विराटचा रहाणेने अप्रतिम झेल घेतला. सीमारेषेच्या दिशेने चेंडू कूच करत असताना त्याने झेल टिपला अन् त्याच्या मदतीला रचिन रवींद्र धावला. दोघांनी मिळून झेल पूर्ण केला. विराट कोहली 20 चेंडूंत 21 धावा करून बाद झाला.

5 बाद 78 असा संघ अडचणीत असताना अनुज रावतने (48) आणि दिनेश कार्तिकने नाबाद (38) धावा कुटल्या. याच्या जोरावर आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 173 धावा केल्या. (IPL 2024)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news