पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जला (PBKS) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. युवा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा (raj angad bawa) संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीने त्याला 2 कोटी रुपयांना संघात सामील केले होते. डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे तो लीगमधून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले आहे. पंजाब संघाला हा दुसरा धक्का आहे. यापूर्वी इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता.
राज बावाच्या (raj angad bawa) जागी पंजाब किंग्जने बदली खेळाडूची घोषणा केली आहे. आयपीएलच्या आयोजकांनी ही माहिती दिली आहे. आयपीएलने जारी केलेल्या मीडिया रिलीझनुसार, पंजाबसाठी राज बावाच्या जागी गुरनूर सिंग ब्रार यांची निवड होणार आहे. गेल्या मोसमात पीबीकेएसकडून दोन सामने खेळलेला राज बावा यंदा डाव्या खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.
गुरनूर सिंग हा अष्टपैलू खेळाडू असून डावखुरा फलंदाज आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याने पंजाबसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 5 सामने खेळले असून 7 विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. तसेच त्याने 26.75 च्या सरासरीने 107 धावा केल्या आहेत. त्याला लिस्ट-ए क्रिकेटमध्ये फक्त 1 सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
बावाने (raj angad bawa) गेल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध आयपीएल पदार्पण केले. त्याला 2 सामने खेळण्याची संधी मिळाली, पण तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून 5.5 च्या सरासरीने फक्त 11 धावा आल्या. त्याचा स्ट्राईक रेट 78.57 होता. या खेळाडूला गोलंदाजीत एकही बळी मिळवता आला नाही. बावाने गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या अंडर-19 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती.
बावाने 2022 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने न्यूझीलंड-ए विरुद्ध पहिला सामना खेळला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 सामने खेळले असून 50.66 च्या सरासरीने 152 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ विकेट्सही घेतल्या आहेत. टी 20 क्रिकेटमध्ये या खेळाडूने 29.66 च्या सरासरीने 89 धावा केल्या आहेत आणि 28.66 च्या सरासरीने 5 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे, जॉनी बेअरस्टो हा आयपीएल सुरू होण्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याच्या जागी पंजाब किंग्जने बदली खेळाडू म्हणोन ऑस्ट्रेलियाचा अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू आणि बिग बॅश लीग म्हणजेच बीबीएलच्या मागील हंगामाचा हिरो मॅथ्यू शॉर्टला संघात सामील करून घेण्यात आले. शॉर्टचा हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे. पण त्याला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही. त्याने बीबीएलमध्ये सलामीला येत 458 धावा केल्या आणि ऑफ-स्पिन गोलंदाजी करून 11 विकेट्स घेतल्या. त्याने टूर्नामेंटच्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब जिंकला होता.