Nathan Ellis : मजुरी करून पोट भरणारा नॅथन एलिस ‘असा’ झाला स्टार क्रिकेटर!

Nathan Ellis : मजुरी करून पोट भरणारा नॅथन एलिस ‘असा’ झाला स्टार क्रिकेटर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जचा (PBKS) वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने (Nathan Ellis) बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले. आपल्या भेदक मा-याने त्याने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 4 विकेट घेण्याची किमया केली. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने अलीकडेच आपल्या गोलंदाजीने टीम इंडियाचा रन मशिन विराट कोहलीलाही त्रास दिला होता. त्याचा क्रिकेटपटू होण्याचा प्रवास संघर्षांनी भरलेला आहे.

राजस्थानविरुद्ध एलिसची कामगिरी कशी होती?

एलिसने (Nathan Ellis) राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 7.50 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आणि 4 षटकात 30 धावा दिल्या. त्याने 11 चेंडूत 19 धावा करून जोस बटलरला बाद केले. यानंतर त्याने संजू सॅमसनला 42 धावा करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तसेच रियान पराग आणि देवदत्त पडिक्कल यांनाही तंबूचा रस्ता दाखवला आणि आपल्या संघाचा विजय सुकर केला. कागिसो रबाडाच्या जागी एलिसचा संघात समावेश करण्यात आला. मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याचा हा तिसरा हंगाम आहे. पंजाबने एलिसला मेगा लिलावात 75 लाख रुपयांना विकत घेतले.

एलिसच्या संघर्षाची कहाणी (Nathan Ellis Struggle)

एलिसने वयाच्या 22 व्या वर्षी न्यू साउथ वेल्सकडून खेळणे सोडले होते. त्याची संघात निवड होत नव्हती. यानंतर एलिस टास्मानियाला गेला. तो ना कोणत्याही संघाशी करारबद्ध होता ना त्याच्याकडे नोकरी होती. त्यामुळे त्याला पैशांची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे त्याला हाती पडेल ते काम करण्याची गरज भासू लागली. अखेर त्याने क्रिकेटचे वेड बाजूला ठेवून पोट भरण्यासाठी एका बांधकाम साईटवर मजुरीचे काम स्विकारले. त्या ठिकाणी तो 5 ते 6 तास काम करायचा.

एका फोन कॉलने सर्व काही बदलले

मजुरी व्यतिरिक्त, एलिस अवजड फर्निचर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याचे काम करत असे. सेल्समन म्हणूनही त्याने काम केले. 2019 मध्ये कोणत्याही कराराशिवाय 2 वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर, एलिसने क्रिकेट सोडण्याचा विचार केला आणि एक दिवस त्याने बॅग भरण्यास सुरुवात केली. तो त्याच्या आयुष्यात आता काहीतरी वेगळे करण्याचा विचार करू लागला होता तोच एक दिवस टास्मानिया क्रिकेटचे तत्कालीन प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ यांच्या फोन कॉलने सगळेच बदलून टाकले.

एलिसने पहिल्या सामन्यात घेतली हॅट्ट्रिक (Nathan Ellis Struggle)

एलिसने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणे सुरूच ठेवले आणि त्याचा त्याला फायदा झाला. 6 ऑगस्ट 2021 रोजी वयाच्या 26 व्या वर्षी एलिसने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बांगलादेशविरुद्धच्या त्या सामन्यात एलिसने शेवटच्या षटकात हॅटट्रिक घेत इतिहास रचला होता. गेल्या महिन्यातच त्याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना आपला बळी बनवले होते. एलिसने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 8.53 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या आहेत. 28 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने फक्त 6.4 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आहे.

एलिसची आयपीएल कारकीर्द कशी राहिली?

एलिसने आयपीएलमध्ये 7 सामने खेळले असून 22.44 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 16.00 राहिला आहे. त्यांच्याविरुद्ध फलंदाजांनी 202 धावा केल्या आहेत. त्याने 25 सप्टेंबर 2021 रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध पहिला आयपीएल सामना खेळला. एलिस गेल्या अनेक वर्षांपासून फ्रँचायझी क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news