Chennai Super Kings : धोनीचे नेतृत्व, स्टोक्सचा धमाका! IPL मध्ये यावेळी चेन्नईला रोखणे कठीण

Chennai Super Kings : धोनीचे नेतृत्व, स्टोक्सचा धमाका! IPL मध्ये यावेळी चेन्नईला रोखणे कठीण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. जगभरातील चाहत्यांच्या नजरा चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)कडे लागल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणा-या या संघाने आपले पाचवे विजेतेपद पटकावण्याचा निश्चय केला आहे. स्पर्धेचे उद्घघाटन सीएसके विरुद्ध गुजरात टायटन यांच्यातील लढतीने होणार असून पहिला सामन्यापासून आपला दरारा निर्माण करण्यासाठी धोनी सेना जय्यत तयारी करत आहे.

41 वर्षीय एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेला (Chennai Super Kings) नऊ वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. त्यापैकी चार स्पर्धांचे विजेतेपद पटकावण्यात धोनीच्या सीएसकेला यश आले आहे. धोनीची मैदानातील केवळ उपस्थिती प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवण्यासाठी पुरेशी आहे. एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो आणि तो संस्मरणीय बनवण्यासाठी तो कोणतीही कसर सोडणार नसल्याचे माजी दिग्गज खेळाडूंचे म्हणणे आहे.

सीएसकेला बेन स्टोक्सकडून खूप अपेक्षा (Chennai Super Kings)

यंदाची आयपीएल स्पर्धा 'होम अँड अवे' फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. त्यामुळे चेन्नईला त्यांच्या घरच्या चिदंबरम मैदानावर सात सामने खेळायला मिळतील. गेल्या मोसमात सीएसकेला प्लेऑफची फेरीही गाठता आली नव्हती. मागच्या हंगामात सीएसकेने अचानक कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले आणि त्यानंतर संघाला सुरुवातीच्या सामन्यांत पराभव पत्करावे लागले. संघाचे हे अपयश पाहता धोनीला पुन्हा कर्णधार करण्यात आले. पण तरीही सीएसके आयपीएलच्या साखळीफेरीतच गारद झाला. त्यामुळे या वेळी चेन्नईला कोणत्याही संघाला हलल्यात घ्यायला आवडणार नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला चेन्नईने आपल्या संघात समावेश करून घेतला आहे. या अष्टपैलू खेळाडूची खेळी धोनीच्या संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकते असा अनेकांचा अंदाज आहे.

ताकद : बेन स्टोक्सच्या उपस्थितीमुळे चेन्नईची क्रॉस हिटिंग मजबूत होईल. चिदंबरम स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर तो एक-दोन शानदार षटके टाकून सामन्याला कलाटणी देऊ शकतो. रवींद्र जडेजा आणि मोईन अली हे देखील घरच्या मैदानावर खूप प्रभावी ठरू शकतात. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड हे फलंदाजीत उपयुक्त ठरतील तर अंबाती रायुडू, स्टोक्स, धोनी आणि जडेजा मधल्या फळीला मजबूत करतील.

कमकुवतपणा : मुकेश चौधरी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडू शकतो जो सीएसकेसाठी मोठा धक्का असेल. दीपक चहर पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर दीर्घकाळानंतर पुनरागमन करत आहे. तो अगामी वनडे विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करावीच लागणार आहे.

धोका : सीएसकेसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते खेळाडूंचे वृद्धत्व. रायुडू आणि अजिंक्य रहाणे उच्च धावसंख्येच्या सामन्यांमध्ये दबावाखाली येऊ शकतात. याशिवाय संघाकडे चांगले भारतीय फिरकीपटूही नाहीत. रवींद्र जडेजा अलीकडे टी-20 मध्ये तेवढी चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रदर्शन (Chennai Super Kings)

2008 : उपविजेता
2009 : चौथे स्थान
2010 : आयपीएल चॅम्पियन
2011 : आयपीएल चॅम्पियन
2012 : उपविजेता
2013 : उपविजेता
2014 : तिसरे स्थान
2015 : उपविजेता
2018 : आयपीएल चॅम्पियन
2019 : उपविजेता
2020 : 7 वे स्थान
2021 : आयपीएल चॅम्पियन
2022 : 9 वे स्थान

सीएसकेचे सुरुवातीचे सात सामने :

31 मार्च : गुजरात टायटन्स विरुद्ध : नरेंद्र मोदी स्टेडियम : संध्याकाळी 7.30 वा
3 एप्रिल : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध : चिदंबरम स्टेडियम : संध्याकाळी 7.30 वा.
8 एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध : वानखेडे स्टेडियम : संध्याकाळी 7.30 वा.
12 एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध : एमए चिदंबरम स्टेडियम : संध्याकाळी 7.30 वा.
17 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध : एम. चिन्नास्वामी स्टेडियम : संध्याकाळी 7.30 वा.
21 एप्रिल : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध : एमए चिदंबरम स्टेडियम : संध्याकाळी 7:30 वा.
23 एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध : ईडन गार्डन्स : संध्याकाळी 7.30 वा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news