IPL चा 1000 वा सामना काही तासांवर! जाणून घ्या पहिल्या, 100व्या आणि 500व्या सामन्याचा इतिहास

IPL चा 1000 वा सामना काही तासांवर! जाणून घ्या पहिल्या, 100व्या आणि 500व्या सामन्याचा इतिहास
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : IPL 1000th Match : 30 एप्रिल 2023 हा दिवस आयपीएलसाठी खूप खास आहे. याचे कारण म्हणजे या दिवशी 1000 वा सामना खेळवण्यात येणार असून यासाठी अवघे काही तास उरले आहेत. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ वानखेडे मैदानावर उतरताच आयपीएलच्या इतिहासातील 1000 वा सामना रंगणार आहे. या सामन्याची विशेष तयारी झाली आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगमधील पहिल्या, 100व्या आणि 500व्या सामन्याचा इतिहास जाणून घेऊया.

आयपीएल इतिहासातील पहिल्या, 100व्या आणि 500व्या सामन्यात काय घडले? हे तीन ऐतिहासिक सामने कधी आणि कुठे खेळले गेले? ते सामने संस्मरणीय सामने होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, त्या सर्व सामन्यांबद्दल माहिती घेणे तुम्हाला नक्कीच आवडेल. (IPL 1000th Match)

आयपीएलचा पहिला सामना, RCB विरुद्ध KKR

जगात सुरू होणारी कोणतीही गोष्ट धमाकेदार असते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेलेला आयपीएल इतिहासातील सलामीचा सामना क्रिकेट जगतात धमाकाच ठरला होता. 18 एप्रिल 2008 च्या संध्याकाळी बेंगलोर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलमची वदळी खेळी आणि केकेआरचा आरसीबीवर बंपर विजय दोन्ही दिसले.

मॅक्युलमने 10 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 73 चेंडूत 158 धावा तडकावल्या. प्रथम खेळताना केकेआरने 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी 82 धावांवर ऑलआऊट झाला आणि शाहरुखानच्या संघाने हा सामना 140 धावांनी जिंकला. हा सामना मॅक्युलमच्या खेळीमुळे आजही लक्षात आहे.

आयपीएलचा 100 वा सामना, KKR विरुद्ध RCB

आयपीएल सुरू होऊन दोन वर्षांनी, म्हणजे या लीगच्या तिसर्‍या मोसमात स्पर्धेच्या इतिहासातील 100 वा सामना खेळला गेला. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे त्यावेळी आयपीएलचे आयोजन करण्यात आले. तो हंगाम द. आफ्रिकेत खेळला गेला, जिथे सेंच्युरियनचे मैदान 100 व्या सामन्याचे साक्षीदार ठरले.

100 व्या सामन्यातही ब्रेंडन मॅक्युलम केकेआरचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने त्याने 64 चेंडूत 84 धावा केल्या. परिणामी केकेआरने 20 षटकात 4 विकेट गमावत 173 धावा केल्या. पण, यावेळी रॉस टेलरच्या झंझावातामुळे आरसीबीने केकेआरचा 6 गडी राखून पराभव केला. टेलरने केवळ 33 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने केलेल्या 81 धावांच्या जोरावर आरसीबीने 19.2 षटकांत लक्ष्य गाठले.

आयपीएलचा 500 वा सामना

तारीख होती 3 मे 2015. आयपीएलचा 9वा हंगाम. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएलच्या 500 व्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तो सामना दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. पहिला फलंदाजी करताना राजस्थानच्या अजिंक्य रहाणेने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली आणि ऐतिहासिक 500 व्या सामन्यात 54 चेंडूत 91 धावा फटकावल्या. याचबरोबर राजस्थानने 20 षटकांत 2 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला 7 विकेट्सवर 175 धावाच करता आल्या आणि त्यांनी तो सामना 14 धावांनी सामना गमावला.

आयपीएलचा 1000 वा सामना : MI विरुद्ध RR

आयपीएलच्या इतिहासातील 500 व्या सामन्याचा भाग झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स आता 1000 वा सामना देखील खेळणार आहे. मुंबई इंडियन्सशी त्यांचा मुकाबला आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी बीसीसीआयकडूनही विशेष तयारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यापूर्वी 10-15 मिनिटांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. (IPL 1000th Match)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news