नितीन देसाई मृत्‍यू प्रकरण : फसवणुकीची होणार चौकशी

नितीन देसाई मृत्‍यू प्रकरण : फसवणुकीची होणार चौकशी
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्‍यू प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. देसाई यांच्या स्टुडिओवर कब्जा करण्याकरिता जोरजबरदस्ती करण्याचा तसेच त्यांना व्याजात फसविण्याचा प्रकार झाला का, आदी गोष्टींची सरकार नक्कीच चौकशी करेल, असे आश्वासन गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. तसेच हा स्टुडिओ एका मराठी माणसाने उभा केला आहे. हा स्टुडिओ त्यांची आठवण म्हणून संवर्धन करता येईल का किंवा तो ताब्यात कसा घेता येईल याबाबत कायदेशीर बाब तपासण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाजपचे आ.आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून देसाई यांच्या जीवन संपवण्याचा मुद्दा उपस्थित केला. देसाईंच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी त्यांनी केली. देसाई यांनी एनडी स्टुडिओवर 180 कोटींचे कर्ज काढले होते. या 180 कोटींचे 252 कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि 'एआरसी एडेलव्हाईस' कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी सभागृहात केली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण यांनी देसाई यांच्या कथित आर्थिक फसवणुकीची चौकशी सरकारने करावीच; पण त्यांनी कर्जतजवळ उभा केलेला भव्य-दिव्य स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली.

त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, देसाई यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्याची चौकशी करत आहोतच. त्यांच्यावर कर्ज होते आणि त्या कर्जामध्ये त्यांचा स्टुडिओ गहाण होता. दुर्दैवाने एनसीएलटीचा निकाल त्यांच्याविरोधात गेला. त्यातून तो सोडवण्याचा ते प्रयत्न करीत होते. दरम्यान, कुठल्याही जाणीवपूर्वक पद्धतीने एआरसीच्या माध्यमातून त्यांचा स्टुडिओवर कब्जा करण्याकरिता काही वेगळ्याप्रकारे दबाव बनविण्यात आला का, जोरजबरदस्ती करण्यात आली का, किंवा कुठे नियमाच्या बाहेर जाऊन व्याजात फसविण्याचा प्रकार झाला का, या सर्व गोष्टींची चौकशी सरकारकडून करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news