आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष : योग जीवनाचा अविभाज्य घटक व्हावा…

आंतरराष्ट्रीय योग दिन
आंतरराष्ट्रीय योग दिन
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या युगात ताणतणाव, मानसिक आजार, लठ्ठपणा- कॅन्सर, रक्तदाब यासारख्या व्याधींनी माणसाला विळखा घातला आहे. विशेषत: तरुण पिढी याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. यातून मुक्तीसाठी योग काळाची गरज आहे. योग शास्त्राचा अभ्यास 365 दिवस अखंड सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे. किंबहुना तो जीवनाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे, असे आवाहन डॉ. संदीप पाटील यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार दि.21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यंदाही योगदिन विविधतेने साजरा होत आहे.

जीवघेण्या स्पर्धेमुळे जीवशैलीत बिघाड

वाढती लोकसंख्या, जीवघेणी स्पर्धा, विविध प्रकारचे प्रदूषण यामुळे कालौघात लोकांची जीवनशैली बिघडली आहे. व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे-पिणे यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, ताणतणाव, मानसिक आजार, कॅन्सर व तत्सम व्याधींनी माणसाचे जीवन अक्षरश: व्यापले आहे. यातून सुटकेसाठी जीम व तत्सम उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जाऊ लागला आहे. वास्तविक जीमसोबतच पारंपरिक योगशास्त्र काळाची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

आंतरिक व बाह्य स्वास्थ्यासाठी योग काळाची गरज

'योगा' हा शब्द चुकीचा असून 'योग' हा योग्य शब्द आहे. यामुळे योगशास्त्र, योग अभ्यास, योग वर्ग असा उल्लेख करावा. योग ही एक साधना असून मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक अशा चार स्तरांवर हा उपयोगी आहे. माणसाच्या आंतरिक आणि बाह्य स्वास्थ्यासाठी योग काळाची गरज असल्याचे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले.

दररोज योग केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. शरीर आणि मनशांतीसाठी योग फायदेशीर मानला जातो. योगमुळे शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. योगात सातत्य ठेवल्यास अनेक व्याधींमधून मुक्तता मिळते, अनेक व्याधींची तीव्रता कमी होते. व्याधी व औषधमुक्त आणि निरोगी जीवनाची अनुभूती मिळते.

योग शालेय अभ्यासक्रमात सहभागी व्हावा

केवळ विविध आसने म्हणजे योग नव्हे. योगासोबतच ध्यानही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे ध्यानयोग गरजेचे आहेत. अगदी लहान मुले, तरुण वयातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या निरोगी जीवनशैलीसाठी योग व ध्यान या गोष्टी गरजेच्या आहेत. यामुळे योग हा विषय शालेय अभ्यासक्रमात सहभागी करणे काळाची गरज असल्याचे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news