International Sex Workers Day: देहविक्रय करणार्‍या महिला झाल्या डिजिटल साक्षर, सोशल मीडियाचा करताहेत पुरेपूर वापर

International Sex Workers Day: देहविक्रय करणार्‍या महिला झाल्या डिजिटल साक्षर, सोशल मीडियाचा करताहेत पुरेपूर वापर

सुवर्णा चव्हाण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: देहविक्रय करणार्‍या सुनीता (नाव बदलले आहे) यांनी बँकेच्या ऑनलाइन व्यवहारापासून ते डिजिटल पेमेंटपर्यंतच्या गोष्टी सुरू केल्या असून, त्या आता नियमितपणे सोशल मीडियाचा वापर करतात. त्या डिजिटल साक्षर बनल्या आहेत. सध्या सुनीता यांच्याप्रमाणे देहविक्रय करणार्‍या महिलांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला असून, हा सकारात्मक बदल घडला आहे, तो महिलांना दिलेल्या सोशल मीडिया वापरण्याच्या प्रशिक्षणामुळे. काही संस्थांकडून महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामुळे महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास मिळाला आहे.

सध्याच्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे काही संस्थांनी महिलांना डिजिटल साक्षर बनविण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महिलांना सोशल मीडिया हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असून, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करावा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून कसे दूर राहावे, याचे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. वस्तीतील महिलांनी चक्क आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार केले आहेत. त्याद्वारे त्यांच्या अडचणींपासून ते विविध विषयांवर बोलू लागल्या आहेत. त्याचबरोबर काहींनी फेसबुक, इन्स्टाग्रामचाही वापर सुरू केला असून, आता वस्तीतील 80 टक्के महिला मोठ्या कुशलतेने सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. शुक्रवारी (दि.2) असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स डेनिमित्त दै. 'पुढारी'ने याविषयी जाणून घेतले.

सहेली संघाच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या,आम्ही त्यांना डिजिटल साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेत असून, त्याद्वारे सोशल मीडिया हाताळण्यापासून ते वापरताना काय काळजी घ्यावी इथपर्यंतच्या गोष्टी त्यांना शिकवल्या जात आहेत. त्यामुळेच महिला काळजीपूर्वक सोशल मीडिया वापरत आहेत. आम्ही महिलांचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपही तयार केला आहे. त्यात महिलांना विविध योजनांची माहिती आणि संस्थेच्या उपक्रमाची माहिती देत आहोत. यामुळे महिलांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे.

दोन वर्षांपासून मी सोशल मीडियाचा वापर करू लागले. यामुळे मला बँकेतील व्यवहारापासून ते डिजिटल पेमेंटपर्यंतच्या गोष्टी करता येत आहेत. त्यामुळे खूप मदत होत आहे. वस्तीतील काही महिलाही सोशल मीडियाचा वापर करू लागल्या असून, आम्ही आमचा व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केला आहे. त्यावर आम्ही सर्वजणी अडीअडचणीबद्दल आणि सरकारच्या विविध उपायोजनांबद्दल माहिती पोस्ट करतो. आमच्यातील काहीजणी संस्थांनी घेतलेल्या झूम कार्यशाळांमध्येही सहभागी होत आहोत. सोशल मीडियामुळे अनेकींना आपल्या मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलता येते. सोशल मीडियाने आमच्या आयुष्यात सकारात्मक बदल केला आहे.

– अमिता ( नाव बदलले आहे)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news