दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असे आपण नेहमी म्हणत असतो. दोन्ही हात नसलेल्या शीतल देवी या काश्मिरी मुलीने जिद्दीला आत्मविश्वास व अथक परिश्रमांची जोड देत आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकून जागतिक स्तरावर कीर्ती मिळविली. तिने मिळवलेले हे यश खरोखरच दिव्यत्वाला साजेसेच आहे.
चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग खेळाडूंच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल हिने तिरंदाजीमधील कंपाऊंड या क्रीडा प्रकारात वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक, दुहेरीत रौप्य पदक तसेच सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्णपदक अशी कमाई केली. तसेच तिने पुढील वर्षी होणार्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे. दिव्यांग खेळाडूंच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी तिरंदाजीची सुरुवात करणार्या शीतलने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली ही उत्तुंग झेप खरोखरीच कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमध्ये भारताने 29 सुवर्ण, 31 रौप्य व 51 ब्राँझ अशी एकूण 111 पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.
जम्मू व काश्मीरमधील किश्तवाड परिसरात असलेल्या लोईधार या खेडेगावात जन्मलेल्या शीतलचे वडील शेतकरी असून आई मेंढीपालनचा व्यवसाय करते. शीतल हिला जन्मतः खांद्यापासूनच दोन्ही हात नाहीत. सहसा खेडेगावात अशा दिव्यांग असलेल्या मुलांकडे अन्य लोक नेहमीच तिरस्काराने पाहत असतात. मात्र शीतलच्या पालकांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि आहे त्या परिस्थितीत सामोरे जात तिचे पालनपोषण केले. हात जरी नसले तरी शीतल हिला लहानपणापासूनच आपल्या घराजवळ असलेल्या झाडांवर चढून पायांच्या सहाय्यानेच वेगवेगळी फळे किंवा फुले काढण्याचा छंद होता.
अमेरिकन खेळाडूकडून प्रेरणा
दूरदर्शनवर वेगवेगळ्या स्पर्धा पाहण्याचा छंद अनेकांना असतो आणि अशा चित्रीकरणातून प्रेरणा घेणारे अनेक असतात. शीतल हिला देखील अशीच प्रेरणा लाभली. सन 2012 मध्ये लंडन येथे पॅराऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये अमेरिकेचा तिरंदाज मॅट स्टुट्झमन सहभागी झाला होता. त्यालाही दोन्ही हात नाहीत. तो पाय व हनुवटीच्या साह्याने तिरंदाजी करीत होता. त्याने ही स्पर्धा गाजवली. त्याच्या या कामगिरीचे थेट प्रक्षेपण पाहून शीतल हिला देखील आपण हा खेळ खेळला पाहिजे असे वाटू लागले. सुरुवातीला झाडाच्या काड्यांच्या सहाय्याने तिने धनुष्य व बाण तयार केले होते. त्याद्वारे तिरंदाजी करताना तिला खूप अडचणी यायच्या. मात्र अफाट जिद्द असल्यामुळे तिने या सर्व अडचणी अतिशय निमूटपणे सहन केल्या. तेथील अन्य सक्षम (दिव्यांग नसलेल्या) खेळाडूंच्या स्पर्धेमध्ये ती भाग घेत असे. स्थानिक स्तरावर दिव्यांग खेळाडूंकरिता स्वतंत्र गट नाही याची तिला पुरेपूर कल्पना होती. मात्र खेळाचा निखळ आनंद घेण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये भाग घेत असे. यश मिळाले नाही तरी अनुभव म्हणूनच ती अशा स्पर्धांकडे सकारात्मक वृत्तीने पाहात असे.
जम्मू व काश्मीरमध्ये सैन्याचे पथक म्हणजे तेथील अनेक स्थानिकांना डोक्यावरचे ओझे वाटत असते. मात्र लोकांच्या रक्षणाबरोबरच तेथील सामाजिक विकासामध्येही सैन्य दलाने हातभार लावला आहे. सन 2021 मध्ये सेना दलाच्या राष्ट्रीय रायफल्स दलातर्फे तेथे स्थानिक पातळीवर क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये शीतल सहभागी झाली होती. तिचे तिरंदाजीमधील कौशल्य पाहून या दलातील लोकांनी तिला स्पर्धात्मक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तिचा शैक्षणिक व वैद्यकीय खर्चाचा भार त्यांनी उचलला. तिला कृत्रिम हात लावण्याबाबतही त्यांनी प्रयत्न केले. मात्र वैद्यकीय कारणास्तव तिला हे हात बसू शकत नव्हते. एरवी पायाच्या साह्याने झाडांवरील फळे काढू शकते तर मग मला कृत्रिम हात नकोच, असेच तिने या दलाच्या पदाधिकार्यांना सुचवले. या पदाधिकार्यांनी तिला कात्रा येथील माता वैष्णवी देवी संस्थान क्रीडा मंडळाच्या प्रशिक्षण केंद्रात कुलदीप वेदवान व भारतीय संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षिका अभिलाषा चौधरी या अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने त्यांनी तिला पाय व हनुवटी किंवा तोंडाच्या सहाय्याने तिरंदाजी कशी करता येईल याचे सखोल मार्गदर्शन केले.
सुरुवातीला ती दररोज जेमतेम पन्नास बाण मारू शकत होती. खरं तर हे करताना तिला अनंत वेदना होत होत्या. मात्र आपल्याला याच खेळात करिअर करायचे आहे आणि देशाचा नावलौकिक उंचावायचा आहे अशी जिद्द डोळ्यासमोर ठेवत तिने या सर्व गोष्टी सहन केल्या. हळूहळू प्रगती करत ती आता दररोज तीनशेपेक्षा जास्त बाण मारू शकत आहे. अनेक दिव्यांग खेळाडूंच्या बाबत असे दिसून येते की, त्यांना एक-दोन अवयव नसले तरी त्यांची आकलन शक्ती आणि एकाग्रता अफाट असते. त्यामुळेच अकरा महिन्यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर तिने आशियाई स्पर्धांसाठी आपली पात्रता पूर्ण केली. आशियाई स्पर्धेमध्ये देखील तिच्यापुढे खूप मोठे आव्हान होते. अनुभवी परदेशी खेळाडू, वेगळे वातावरण, प्रतिकूल वारे अशा आव्हानांना सामोरे जात तिने सोनेरी कामगिरी केली. तिच्या या देदीप्यमान कामगिरीने केवळ भारतीयांना नव्हे तर जगातील अनेकांना नवीन प्रेरणा मिळवून दिली आहे. हात नसले तरीही आपण चांगले काम करू शकतो हे तिने दाखवून दिले आहे.
शासनाकडून सकारात्मक पावले
भारतीय पॅराऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा दीपा मलिक या स्वतः पॅराऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडू आहेत. त्यामुळेच दिव्यांग खेळाडूंना कोणत्या अग्निदिव्यातून पार पाडावे लागते याची त्यांना चांगली कल्पना आहे. त्यामुळेच त्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दिव्यांग खेळाडूंसाठी केंद्र शासनाच्या मदतीने अनेक सकारात्मक पावले उचलली. त्यामुळेच की काय, टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने पाच सुवर्णपदकांसह 19 पदके मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली होती. अन्य सक्षम खेळाडूंप्रमाणे दिव्यांग खेळाडूंना देखील फिजिओ, मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञ, मसाजिस्ट, आवश्यक असेल तर परदेशी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, परदेशात प्रशिक्षण इत्यादी अनेक सुविधा मिळतील याची काळजी भारतीय पॅराऑलिम्पिक संघटनेने घेतली आहे. त्यामुळेच दिव्यांग खेळाडूंमध्ये देखील आपण देशासाठी पदक मिळवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत याचीही इच्छाशक्ती निर्माण झाली आहे. त्याचे सकारात्मक फलित नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग खेळाडूंच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दिसून आले आहे.
केंद्र शासनाने गेल्या सहा सात वर्षांमध्ये जम्मू व काश्मीर सारख्या अशांत भागामध्ये क्रीडा विकासाद्वारे जनमानसात शासनाविषयी सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. या भागातील अनेक खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये जागतिक स्तरावर चमक दाखवू लागले आहेत. दिव्यांग म्हणजे देखील माणसेच आहेत. त्यांच्याकडे तिरस्काराने न पाहता सकारात्मकतेनेच पाहिले पाहिजे हे दिव्यांग खेळाडूंनी जागतिक स्तरावरील अनेक स्पर्धांद्वारे मिळवलेल्या यशाने दाखवून दिले आहे. अवघ्या सोळाव्या वर्षी शीतल हिने मिळवलेले यश निश्चितच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आहे.