ब्लॉकचेन तंत्रज्ञान नेमके आहे तरी काय?

ब्लॉकचेन तंत्रज्ञान नेमके आहे तरी काय?
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा ः अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ज्या विविध घोषणा केल्या, त्यापैकी एक घोषणा रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल करन्सीसंबंधी होती. 2022-23 मध्ये म्हणजे याच आर्थिक वर्षात सरकार डिजिटल करन्सी आणणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून हे आभासी चलन जारी केले जाईल.

बिटकॉईन, डॉजकॉईन या आभासी चलनांची लोकप्रियता वाढत असताना भारतात डिजिटल चलनाला मंजुरी कधी मिळणार, हा प्रश्‍न गेल्या काही वर्षांपासून विचारला जात होता. बिटकॉईन वगैरे आभासी चलनांना मान्यता मिळो वा ना मिळो, सरकार स्वतःचे डिजिटल चलन आणणार हे मात्र आता स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेकडून जो डिजिटल रुपया जारी करण्यात येईल तो ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित असेल. ब्लॉकचेनवर आधारित तंत्रज्ञानात कोणतेही गडबड-घोटाळे करता येणे शक्य नसते, असे तज्ज्ञ सांगतात. प्रत्येक व्यवहाराची नोंद कायमस्वरूपी राहते. ही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.

युरोमनीच्या अहवालानुसार, ब्लॉकचेन हे कोणताही डिजिटल व्यवहार अत्यंत सुरक्षित करणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल व्यवहार केल्यास त्यात कोणालाही हस्तक्षेप किंवा छेडछाड करता येत नाही. बिझनेस नेटवर्कमध्ये केल्या गेलेल्या मालमत्तांचे सर्व व्यवहार हे तंत्रज्ञान सुरक्षित राखते.

थोडक्यात जाणून घ्यायचे झाल्यास, ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये सर्व व्यवहार व्हर्च्युअली ट्रॅक केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन फसवणूक रोखणे शक्य होते. जेव्हा एखादी व्यक्‍ती अन्य व्यक्‍तीला क्रिप्टोकरन्सी पाठवते, तेव्हा या व्यवहाराचा डेटा कॉम्प्युटरकडे जातो. त्याच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीत झालेला व्यवहार व्हॅलिडेट केला जातो आणि नंतर त्या व्यवहाराचा समावेश डिस्ट्रिब्युटेड लेजरमध्ये केला जातो. अशा प्रकारच्या व्यवहाराची नोंद एका ब्लॉकच्या स्वरूपात होते.

या ब्लॉकचा आकार सुमारे 1 एमबी एवढा असतो. जेव्हा एक ब्लॉक पूर्णपणे भरतो तेव्हा तो ब्लॉक करून नवीन ब्लॉक तयार केला जातो आणि नवा ब्लॉक पहिल्या ब्लॉकला जोडला जातो.

हे सर्व ब्लॉक एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे त्याला ब्लॉक चेन असे म्हणतात. कोण, कुठे, केव्हा, का आणि किती यांसारखी माहिती ब्लॉक अत्यंत सूक्ष्मपणे नोंदवून घेतो आणि जतन करून ठेवतो.

या ब्लॉकची एक चेन तयार होत असल्यामुळे संपत्तीच्या चलनवलनाची माहितीसुद्धा त्याद्वारे मिळू शकते. किती रक्‍कम कुणाकडून कुणाला कोणत्या दिवशी किती वाजता पोहोचली, या नोंदी ब्लॉकमध्ये सेव्ह राहतात. व्यवहारांचा क्रमही या बॉक्सच्या माध्यमातून सेव्ह केला जातो.

हे ब्लॉक एकमेकांना अशा प्रकारे जोडले जातात, की अन्य कोणत्याही बॉक्सला मध्ये शिरकाव करता येत नाही. त्यामुळेच ब्लॉकचेनला मजबुती मिळते. तज्ज्ञांच्या मते, कोणताही व्यवसाय अचूक माहितीवर बर्‍याच अंशी आधारित असतो. जितकी सूक्ष्म माहिती मिळेल, तितका फायदा व्यवसायात होतो. या बाबतीतही ब्लॉकचेनला महत्त्व प्राप्त होते. ब्लॉकचेनमुळे व्यवसायासाठी आवश्यक असलेली माहिती त्वरित उपलब्ध होते.

आणखी एक महत्त्वपूर्ण बाब अशी की, ब्लॉकचेनवर शेअरविषयक माहिती पारदर्शक पद्धतीने मिळू शकते आणि त्या ठिकाणी नोंदविलेले व्यवहार कधीच बदलता येऊ शकत नाहीत. ऑर्डर, पेमेन्ट, अकाऊंट याव्यतिरिक्‍त ब्लॉकचेनच्या आधारे अन्य गोष्टींबद्दलही माहिती मिळविता येऊ शकते.

या माध्यमातून सभासद एन्ड-टू-एन्ड व्यवहाराचीही तपासणी करू शकतात. ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आभासी चलनाच्या वापरासाठी आज आपल्याला माहीत झाले असले तरी ते आजचे नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उल्लेख 1991 मध्ये स्टुअर्ट हबर आणि डब्ल्यू स्कॉट स्टोर्नेटो यांनी केला होता. या तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश डिजिटल डॉक्युमेन्ट्स 'टाइमस्टॅम्प' करणे हा होता. याच कारणामुळे डिजिटल करन्सीमध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल करन्सी मात्र आली ती 2009 मध्ये सतोशी नाकामोतो यांनी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बिटकॉईनची निर्मिती केली.

महेश कोळी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news