Moon : चंद्राचा अंतर्गत कोअर लोखंडासारखा ठोसच!

Moon : चंद्राचा अंतर्गत कोअर लोखंडासारखा ठोसच!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : खगोल शास्त्रज्ञांसाठी चंद्राची अंतर्गत संरचना ही नेहमीच कुतुहलाचा विषय बनून राहिलेली आहे. याबाबत बरेच संशोधनही करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे चंद्राची भूगर्भ संरचना ही त्याचा पृथ्वीशी असलेल्या संबंधाचा इतिहास दर्शवणारी आहे. चंद्राच्या भूगर्भ संरचनेचा अभ्यास हा केवळ चंद्राचीच नव्हे तर पृथ्वी व एकंदरीतच आपल्या सौरमंडळाबाबतही महत्त्वाची माहिती देणारा ठरू शकतो. आता संशोधकांनी चंद्राच्या अंतर्गत कोअरविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. चंद्राचा कोअर हा द्रवरूप नसून तो ठोस आहे तसेच त्याचे घनत्व लोखंडासारखेच असल्याचे यामधून स्पष्ट झाले आहे.

सौरमंडळातील खगोलांच्या अंतर्गत संरचनांबाबतची माहिती भूकंपीय आकडेवारीतून समजू शकते. अंतर्गत सक्रियतेमुळे येणार्‍या भूकंपांमुळे ध्वनीलहरी निर्माण होतात. त्यामधून चंद्र आणि पृथ्वीसारख्या खगोलांच्या अंतर्गत रचनेविषयीची माहिती मिळू शकते. त्यांच्या मदतीने वैज्ञानिक अशा खगोलांचा विस्तृत आंतरिक नकाशा बनवू शकतात.

'नासा'च्या अपोलो मोहिमेत चंद्राच्या भूकंपीय हालचालींशी संबंधित आकडेवारी मिळाली होती. त्यावरून चंद्राच्या अंतर्गत कोअरची अवस्था कशी आहे याची माहिती मात्र समजू शकत नव्हती. चंद्राच्या अंतर्गत भागात वाहणारा कोअर आहे इतकेच समजले होते, पण त्याच्या आसपास काय आहे याबाबत मतभेद होते. विशेष म्हणजे ठोस कोअर आणि तरल कोअर असे दोन्ही प्रकारचे मॉडेल अपोलो मोहिमांमधील आकडेवारीशी सुसंगत दिसत होते.

आता फ्रान्समधील फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे खगोलशास्त्रज्ञ आर्थर ब्रियॉड आणि त्यांच्या टीमने नेमकी स्थिती स्पष्ट करण्यासाठी अंतराळ मोहिमा आणि लूनार लेसर रेंजिंग प्रयोगांमधून गोळा केलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला. त्यामधून चंद्राचा हा 'इनर कोअर' ठोसच आहे आणि त्याचे घनत्व लोखंडासारखे आहे हे स्पष्ट झाले. या संशोधनामुळे चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राच्या विकासाबाबत काही प्रश्न निर्माण होतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news