पुढारी ऑनलाईन : रमजान महिन्यातही पाकिस्तानी जनतेला महागाईपासून दिलासा मिळालेला नाही. पाकिस्तामध्ये महागाईने विक्रमी (Inflation in Pakistan) पातळी गाठली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किंमती देखील सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेली पाकिस्तानी जनता महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात आहे. सेन्सिटिव्ह प्राइस इंडिकेटर (SPI) नुसार, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये महागाई 47 टक्क्यांवर पोहोचली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर पाकिस्तानच्या सांख्यिकी ब्युरोने देखील महागाई संदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
पाकिस्तानच्या सांख्यिकी ब्युरोने दिलेल्या आकडेवारीनुसार, कांदे (२८८ टक्के), गॅस (१०८ टक्के), मैदा (१२० टक्के), सिगारेट (१६५ टक्के), डिझेल (१०२ टक्के), चहा (९४ टक्के), केळी (८९ टक्के), बासमती तांदूळ (८१ टक्के), पेट्रोल (८१ टक्के), अंडी (७९ टक्के) महागली आहेत. आकडेवारीनुसार, ५१ जीवनावश्यक वस्तूंपैकी २६ वस्तूंच्या किमती वाढल्या (Inflation in Pakistan) आहेत. १२ वस्तूंच्या किमतीत किंचित घट झाली असून, १३ वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानमध्ये इतर जीवनावश्यक वस्तूंबरोबर केळीचे दरही वाढले आहेत. केळी जास्तीत जास्त ५०० रुपये प्रति डझनने विकली जात आहे. भौगोलिक स्थान आणि उपलब्धतेनुसार केळीची विक्री 250 ते 500 रुपये प्रति डझन दरम्यान होत असल्याचे ऑनलाइन विक्रीतून दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात केळीच्या दरात ११.०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चिकन (८.१४ टक्के), तिखट (२.३१ टक्के), एलपीजी (१.३१ टक्के), मोहरीचे तेल आणि लसूण (१.१९ टक्के), तूप (०.८३ टक्के), खाद्यतेल (०.२१ टक्के) कमी झाले आहे.
तीव्र महागाईच्या परिस्थितीमध्ये देखील पाकिस्तानसाठी काहिशी दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांच्या परकीय चलनाच्या साठ्यात थोडीशी वाढ झाली आहे. १७ मार्च २०२३ पर्यंत पाकिस्तानचा परकीय चलन साठा १०.१४ अब्ज डॉलर इतका झाला आहे. परकीय चलनाच्या गंगाजळीत घट झाल्यामुळे पाकिस्तानला पेमेंटच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान २०१९ मध्ये IMF ने पाकिस्तानला ६.५ अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज जाहीर केले होते. पाकिस्तानला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी हे पॅकेज अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र यामधील वाटाघाटीच्या कारणामुळे १.१ अब्ज डॉलरचा ह्प्ता आएमएफ कडून अडकला आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याने पाकिस्तान मदतीवाचून अडला आहे.