ओमायक्रॉन ही एक प्रकारची नैसर्गिक लस! भारतातील वरिष्ठ डॉक्टरांचा दावा

ओमायक्रॉन ही एक प्रकारची नैसर्गिक लस! भारतातील वरिष्ठ डॉक्टरांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : ओमायक्रॉन ही एक प्रकारे कोरोनाविरुद्धची नैसर्गिक लसच आहे. ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर कुणीही गंभीरपणे आजारी पडत नाही. उलट या व्हेरियंटची लागण झाल्याने शरीरात कोरोनाविरुद्ध प्रतिपिंडे (अँटिबॉडी) तयार होतात. या अर्थाने ओमायक्रॉन हा कोरोनाविरुद्ध लसीसारखेच काम करतो, असे ख्यातनाम इम्युनोलॉजिस्ट तसेच 'जेएनयू'तील (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) डॉ. गोवर्धन दास यांनी स्पष्ट केले आहे.

देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत वाढ होत असताना आरोग्य क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी ओमायक्रॉन हा शाप नसून वरदान असल्याचेच जणू म्हटलेले आहे.

ओमायक्रॉन हे डेल्टा व्हेरियंटचेच सौम्य स्वरूप आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनमध्ये म्युटेशन्स (बदल) जास्त प्रमाणात झालेले असले तरी ओमायक्रॉन हा डेल्टाप्रमाणे लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत नसल्याचेच चित्र सर्वत्र आहे, असेही डॉ. दास यांनी म्हटले आहे.

वेळ पुढे सरकत गेली तसा कोरोना विषाणू कमकुवत होत गेलेला आहे. लस तयार करताना शास्त्रज्ञ जे तंत्र वापरतात ते असेच असते. जो आजार रोखायचा, त्याच आजाराची कमकुवत प्रतिपिंडे मानवी शरीरात लसीच्या रूपात टोचली जातात. यामुळे विषाणूविरुद्ध यशस्वी मुकाबल्यासाठीची रोगप्रतिबंधक क्षमता शरीरात वाढते. याच सूत्रानुसार आम्ही जेवढे या विषाणूशी लढू, तेवढी आमची 'इम्युन सिस्टीम' (रोगप्रतिकारक क्षमता) कोरोनाविरुद्ध अधिक मजबूत होईल. या अर्थाने ओमायक्रॉन व्हेरियंट ही कोरोनाविरुद्ध सर्वांत प्रभावी लस आहे.

ओमायक्रॉन गरीब देशांना लाभदायक

मॅक्स हेल्थकेअर समूहाचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप बुद्धिराजा यांनी सांगितले, ओमायक्रॉन ही कोरोनाविरुद्धची नैसर्गिक लस असल्याच्या डॉ. दास यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. ज्या गरीब देशांत लसीकरण झालेले नाही, त्यांच्यासाठी ओमायक्रॉन व्हेरियंट हे वरदानच आहे. मोजक्या लक्षणांसह हा व्हेरियंट लोकांना संक्रमित करेल आणि मोठ्या लोकसंख्येत कोरोना प्रतिबंधक क्षमता विकसित होईल.

ओमायक्रॉन आमच्यासाठी नैसर्गिक लस ठरेल : आयसीएमआर

'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'चे (आयसी एमआर) शास्त्रज्ञ डॉ. एन. के. मेहरा यांनीही डॉ. दास यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, ओमायक्रॉन आमच्यासाठी वरदान सिद्ध होऊ शकतो. तथापि या व्हेरियंटमुळे प्रत्येक देशात एकसारखे संक्रमण होते की नाही, ते पाहणे आवश्यक ठरेल. त्यामुळे तूर्त कोरोना नियमावलीची अंमलबजावणी आवश्यक आहे.

निसर्गात सक्रिय राहण्यासाठी विषाणू निसर्गाच्या अनुकूल बदल स्वत:मध्ये घडवत असतो. कोरोना विषाणूसोबत असेच घडते आहे. ओमायक्रॉन अधिक संक्रमक आहे. पण, निसर्गानुरूप कमकुवतही आहे. प्राणघातक विषाणू एका व्यक्‍तीला संक्रमित करून त्याच्यासह स्वत:ही नष्ट होतो. पण त्याचा सौम्य व्हेरियंट निसर्गात सक्रिय राहून वेगाने पसरतो व लोकांची रोगप्रतिबंधक क्षमता वाढवतो.
– प्रा. डॉ. अमिताभ बॅनर्जी, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news