इंदिरा गांधी, मुलायमसिंह यादव यांनीही गमावले होते पक्ष अन् चिन्ह

इंदिरा गांधी, मुलायमसिंह यादव यांनीही गमावले होते पक्ष अन् चिन्ह

Published on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले गेले आहे. पण, हे असे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री तसेच समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्यावर निवडणूक चिन्ह अन् पक्षावरील दावा गमावण्याची वेळ आली होती. आयर्न लेडी इंदिरा गांधींवर तर निवडणूक चिन्ह बदलण्याची वेळ दोनदा आली.

काँग्रेसची बदललेली चिन्हे

बैलजोडी : पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी होते. १९५२, १९५७ व १९६२ या तीन निवडणुका या चिन्हावर लढवल्या गेल्या होत्या. नेहरूंनंतर लालबहादूर शास्त्री यांनीही या चिन्हावर निवडणूक लढविली व जिंकली होती.

गाय-वासरू : शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर काँग्रेसची सूत्रे इंदिरा गांधी यांच्याकडे आली; मात्र काही ज्येष्ठ नेत्यांनी वेगळा गट स्थापन करून काँग्रेस (आर) पक्ष बनवला. बैलजोडी चिन्हावरील या गटाचा दावा निवडणूक आयोगात ग्राह्य धरला गेला. इंदिरा गांधी यांना गाय-वासरू हे चिन्ह मिळाले. 'गाय वासरू, नका विसरू' हे घोषवाक्य मराठीत फार प्रसिद्धही झाले होते.

हाताचा पंजा : इंदिरा गांधी यांनी १९७१ ची निवडणूक गाय-वासरू चिन्हावर लढविली आणि जिंकलीही. त्यानंतर १९७५ मध्ये पुन्हा परिस्थिती बदलली. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. इंदिरा गांधी यांनी नवीन पक्ष स्थापन करून त्याला कॉंग्रेस (आय) हे नाव दिले. इंदिरा गांधी यांनी यावेळी पंजा हे चिन्ह निवडले. ते आजतागायत कायम आहे.

समाजवादी बाप-लेकांतील फूट

१४ ऑक्टोबर १९९२ रोजी समाजवादी पक्षाची स्थापना झाली. १९९३ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सायकल हे चिन्ह समाजवादी पक्षाने घेतले होते. निवडणुका जिंकून मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले. २०१६ मध्ये मुलायमसिंह यादव यांचा मुलगा अखिलेश यादव पक्षातून बाहेर पडला. अखिलेश यांनी आपलाच पक्ष समाजवादी पक्ष असल्याचा दावा केला. वाद निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने १७ जानेवारी २०१७ रोजी दिलेल्या निर्णयान्वये अखिलेश यादव यांना पक्ष व चिन्ह दिले गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news