भारताचे अंटार्क्टिकावर होणार नवीन संशोधन केंद्र

भारताचे अंटार्क्टिकावर होणार नवीन संशोधन केंद्र

पणजी :  अंटार्क्टिकावर संशोधन केंद्राच्या ठिकाणी जानेवारी 2030 पर्यंत नवीन वैज्ञानिक संशोधन केंद्र बांधण्याची भारताची योजना आहे. त्यासाठी वास्को येथील भारतीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन संस्था (एनसीपीओआर) ने केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करून नवीन केंद्रासाठी यापूर्वीच जागा निश्चित केली आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाने नवीन केंद्राच्या डिझाईनला तत्वतः मान्यता दिली असून याकेंद्राशी समन्वय ठेवणारे उपकेंद्र वास्कोत होणार आहे. नवीन संशोधन केंद्र बांधणे अत्यावश्यक असल्याची माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत नुकतीच दिली होती. प्रस्तावित प्रकल्पासाठी सर्व पर्यावरणीय नियमांचेही पालन करावे लागणार आहे.

अंटार्क्टिका आणि तेथील भारतीय संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी 1988 मध्ये स्थापन झालेल्या 'मैत्री' संशोधन केंद्राची कालमर्यादा केवळ 10 वर्षे होती. मैत्रीची अनेक जुनी यंत्रप्रणाली दुरुस्तीच्या पलीकडे आहे. या यंत्रणांचा वापर अधिकाधिक झाला असून ती कालबाह्य झाली आहे. त्यामुळे संशोधन करताना मर्यादा येत असल्याची माहिती एनसीपीआरचे संचालक डॉ. थंबन मेलोथ यांनी दिली. यंत्रणांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास संशोधनात अजून गती येणार आहे. मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिकाच्या मध्यवर्ती 'ड्रोनिंग मॉड लँड' प्रदेशातील सर्वांत मोठ्या पर्वत शृंखलांपैकी एकासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करण्यासाठी बर्फमुक्त, खडकाळ क्षेत्रावर बांधले गेले. ते किनार्‍यापासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे आणि उन्हाळ्यात 70-90 संशोधकांना आणि हिवाळ्यात 25 संशोधकांना सामावून घेतानाच याकेंद्राची मदत होऊ शकते. नवीन केंद्र 'मैत्री'च्या नजीक येऊ शकते आणि सुमारे 90 शास्त्रज्ञांना सामावून घेण्यास सक्षम असेल.

मेलोथ म्हणाले, नवीन स्टेशन अधिक शास्त्रज्ञांना मदत करण्यास सक्षम असेल आणि प्रगत प्रयोगशाळेसाठी जागा असेल. यामुळे पर्यावरण, हवामानाशी संबंधित संशोधनाला मोठी चालना मिळेल. भारताने 2022 मध्ये भारतीय अंटार्क्टिक कायदा पास केला. शिवाय, भारतीय अंटार्क्टिक पर्यावरण संरक्षण नियम, 2023, अंटार्क्टिक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कटीबद्ध असणार आहे. नवीन केंद्रातही या नियमांचे पालन निश्चितपणे होणार असल्याचे मेलोथ म्हणाले.

नवीन तळासाठी सविस्तर अभ्यास चालू असून जो भारतीय सर्वेक्षणाद्वारे सुरू आहे. एनसीपीओआरला मास्टर प्लॅनचा विकास, सल्लागारांची नियुक्ती आणि संशोधन केंद्राच्या डिझाईनसाठी अंदाजे 18 महिन्यांचाकालावधी लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प साकारण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली जाईल.

चीन अंटार्क्टिकामध्ये अनेक संशोधनाशी संबंधित सुविधा उभारत आहे. चीन बर्फाळ आणि संसाधनांनी समृद्ध दक्षिणेकडील खंडात पाचवे संशोधन केंद्र तयार करत असून यासाठी सुमारे 450 हून अधिक कर्मचार्‍यांचा समावेश असलेली नवीन अंटार्क्टिक वैज्ञानिक मोहीम टीम त्यांनी तिथे पाठवली आहे. चीनने आपल्या नवीन संशोधन तळावर उन्हाळ्यात 80 मोहीम संघ सदस्य आणि 30 हिवाळ्यात तैनात करण्याची योजना आखली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news