पुण्यात पार पडली पाळीव प्राण्यावर भारतातील पहिली लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

File photo
File photo
Published on: 
Updated on: 

पुणे : पुढारी वृत्तसेवा :   शस्त्रक्रियेनंतर या मुक्या जीवाला वेदनारहित आयुष्य जगता येत आहे. पित्ताशयाच्या आजारावर लॅप्रोस्कोपिक स्वरूपाची अशी ही भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. सिंहगड रोड येथील विजय बदाडे यांचा 3 वर्षीय पाळीव कुत्रा डॉबी याला ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे आणि आमांश यांसारखी लक्षणे आढळल्याने संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त झाले होते. पुढील तपासणीसाठी त्याला तत्काळ स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकमध्ये नेण्यात आले. डॉ. नरेंद्र परदेशी, डॉ. शशांक शहा, डॉ. सुशील खरात आणि रीना हरिभट यांच्या पथकाने डॉबीवर शस्त्रक्रिया केली.

पशुशल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, 'या कुत्र्याच्या यकृतातील एन्झाइमचे प्रमाण खूप वाढले होते. प्लेटलेट्स पातळी 77 हजार इतकी कमी झाली होती. त्याला पित्ताशयाचा संसर्ग झाला होता. डॉबीची प्रकृती सुधारण्यासाठी सलाईन तसेच इंजेक्शन देण्यात आले. अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये फुगलेले आणि विस्तारलेले पित्ताशय दिसले. त्यानंतर पित्ताशय काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.'
कमी वेदना, लहान चिरे, रुग्णालयातील कालावधी कमी करणे तसेच पारंपरिक शस्त्रक्रियेमुळे येणारे अपंगत्व टाळण्यासाठी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचा पर्याय निवडण्यात आला. शस्त्रक्रिया 2 तास चालली. 3-4 तासांनी डॉबीने द्रवपदार्थांच्या सेवनास सुरुवात केली आणि त्यानंतर तो घनपदार्थांचेही सेवन करू लागला. शस्त्रक्रियेनंतर त्याच दिवशी डॉबीला घरी सोडण्यात आले.

मानवांच्या तुलनेत कुत्र्यांमध्ये लॅप्रोस्कोपिक पध्दतीने पित्ताशय काढून टाकणे ही दुर्मीळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. यकृताच्या मध्यभागी ट्रोकार आणि कॅन्युला टाकणे, सामान्य पित्तनलिकेपर्यंत पोहोचणे हे प्रमुख अडथळे होते. सामान्य पित्तनलिकेमध्ये लिगेशन आणि हेमोक्लिप लावणे अधिक आव्हानात्मक होते. डॉक्टरांच्या टीमने हे आव्हान यशस्वीरीत्या पार पडले.
                                                        -डॉ. शशांक शाह, बॅरियाट्रिक सर्जन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news