2035 ला भारतीय अंतराळ स्थानक; 2040 ला पहिला भारतीय चंद्रावर, पंतप्रधानांकडून भविष्‍यातील कार्यक्रमांचा आढावा

2035 ला भारतीय अंतराळ स्थानक; 2040 ला पहिला भारतीय चंद्रावर, पंतप्रधानांकडून भविष्‍यातील कार्यक्रमांचा आढावा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विविध अंतराळ मोहिमांत मानाचे स्थान पटकावणार्‍या भारताने भविष्यात अंतराळ विजयाची महत्त्वाकांक्षा ठेवली असून 2025 मध्ये पहिला अंतराळवीर भारतातून झेपावेल, तर 2035 ला भारतीय अंतराळ स्थानक कार्यान्वित होईल. 2040 ला चंद्रावर पहिला भारतीय उतरेल अशी आखणी करून त्या दिशेने काम करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्या.

पंतप्रधानांनी मंगळवारी भारताच्या अंतराळ कार्यक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीत भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांच्या पूर्वतयारीचा व त्यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. 2025 साली भारतातून पहिला अंतराळवीर झेपावणार असून, त्याबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

या बैठकीत खगोलशास्त्र विभागाच्या वतीने गगनयान योजनेचा आढावा सादर केला. त्यात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, मानवासह झेपावणारे अंतराळयान, त्याची यंत्रणा याबाबत माहिती देण्यात आली. मानवाला घेऊन झेपावणार्‍या यानाच्या 20 महत्त्वाच्या चाचण्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 मोहिमांच्या यशामुळे भारताने आता आणखी नवीन आणि महत्त्वाकांक्षी ध्येये बाळगायला हवीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. त्यात 2035 मध्ये भारतीय अंतराळ स्थानक सुरू करणे आणि 2040 मध्ये चंद्रावर पहिला भारतीय उतरण्याची मोहीम यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसेच भारतीय वैज्ञानिकांनी आता शुक्र व मंगळ मोहिमांवरही काम करण्याचे आवाहन केले.

आणखी चांद्रयान मोहिमा

खगोलशास्त्र विभाग भविष्यातील चंद्रावरील मोहिमांचा आराखडा तयार करणार असून, आगामी काळात आणखी चांद्रयान मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत. तसेच सध्या वापरात असलेल्या प्रक्षेपक वाहनात सुधारणा करून पुढील पिढीतील वाहन तयार करणे, नवीन लाँचपॅड निर्मिती आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा व संबंधित तंत्रज्ञान निर्मिती व विकास योजना यावर भर देण्यात येणार आहे.

शनिवारी होणार गगनयानाची चाचणी

बंगळूर : श्रीहरिकोटा येथे शनिवारी म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी गगनयानाची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. यात इस्रोचे एक यान 17 कि.मी.पर्यंत आकाशात झेपावेल. त्यात असलेली अंतराळवीरांची कुपी यानापासून विलग होत पॅराशूटच्या मदतीने समुद्रात पडेल. समुद्रात नौदल आणि इस्रोची पथके तैनात असतील. ते ही कुपी बाहेर काढतील. प्रत्यक्ष गगनयानाच्या प्रवासात मात्र या कुपीत अंतराळवीर असतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news