बिझनेस ट्रिपवर गेलेल्या भारतीयाचा तुर्कीच्या भूकंपात मृत्यू

बिझनेस ट्रिपवर गेलेल्या भारतीयाचा तुर्कीच्या भूकंपात मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: शक्तीशाली भूकंपानंतर तुर्की, सीरिया दोन्ही देशात मृत्यूचे तांडव माजले. वेगाने बचावकार्यला सुरूवात झाली. अनेक मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान बिझनेस ट्रिपवर गेलेल्या एका भारतीयाचा तुर्कीच्या भूकंपात मृत्यू झाला आहे. त्‍यांचा मृतदेह तुर्कीतील एका शहरातील हॉटेलच्या ढिगाऱ्यात सापडला, अशी माहिती भारतीय दूतावासाने ट्विट करत दिली आहे.

तुर्कस्‍तान आणि सीरियात ६ फेब्रुवारी झालेल्या शक्‍तीशाली भूकंपात  २८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ढिगाऱ्याखालून मृतदेह काढले जात आहेत. दरम्यान, भूकंपात एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ३६ वर्षीय विजय कुमार असे या भारतीयाचे नाव आहे. ते कंपनीच्या कामानिमित्त तुर्कस्‍तानला गेले होते.  येथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. भूकंपानंतर ते बेपत्ता होते. भारतीय दूतावासाने ट्विटरवरून भारतीय नागरिक विजय कुमार यांचा मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली आहे.

'द क्विंट'मधील वृत्तानुसार, विजय कुमार हे बंगळूरमधील ऑक्सिप्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या गॅस-प्लांट कंपनीमध्ये टेक्नीशियन म्हणून काम करत होते. ते मूळचे उत्तराखंडचे रहिवासी होते. कंपनीच्‍या कामानिमित्त ते २५ जानेवारी रोजी तुर्कीला गेले होते. ते तुर्कीतील मालत्या शहरात अवसार हॉटेलात राहत होते.  ६ फेब्रुवारी रोजी तुर्कस्‍तानमधील शक्‍तीशाली भूकंपात विजय कुमार वास्‍तव्‍याला असणारे हॉटेल कोसळले. यामध्‍ये त्‍याचा मृत्‍यू झाला. मालत्‍या येथील हॉटेलच्‍या ढिगा-याखाली त्यांचा मृतदेह सापडला आहे.

उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे राहणारा त्यांचा भाऊ अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते तुर्कीला गेल्यापासून रोज रात्री कुटूंबाशी फोनवर बोलत असत. मात्र रविवारी रात्री (६ फेब्रुवारीच्या पहाटे) त्यांचा फोन आला नाही. दुसऱ्या दिवशी कुटुंबाला कळले की, तुर्की आणि सीरियात भूकंप झाला आहे. विजय कुमार यांच्‍या पश्‍चात पत्नी पिंकी गौर आणि ६ वर्षांचा मुलगा आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांचे वडील रमेश चंद गौर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. असे वृत्त द क्विंटने दिले आहे.

भारताकडून 'ऑपरेशन दोस्त'; काही तासात वैद्यकीय मदत

तुर्कस्‍तानमधील हाताय  शहरात भारतीय सैन्याकडून 60 पॅराफिल्ड सेटअप उभारण्यात आले आहेत. यामध्ये 30 खाटांचे हॉस्पिटल उभारले आहे. 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भूकंपातून वाचलेल्या जखमींना काही तासात या ठिकाणी दाखल केले जाते. त्यानंतर काही तासांतच जखमींना वैद्यकीय उपचार आणि मदत देण्यात येते. भारताच्या या वैद्यकीय पथकात १४ डॉक्टर आणि ८६ पॅरामेडिक्सचा समावेश आहे. भारताने उभारलेल्या वैद्यकीय तंबुत अनेक रूग्ण उपचार घेत असल्याचे मेजर डॉ. बीना तिवारी यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितले.

तुर्कीत भारताचे सातवे मदत विमान दाखल

ऑपरेशन दोस्त अंतर्गत सातवे विमान रविवारी (दि.१२) भूकंपग्रस्त सीरियात दखल झाले. यातून 23 टनांहून अधिक मदत सामग्री तुर्की, सीरियातील भूकंपग्रस्त भागासाठी पोहचवली. स्थानिक प्रशासन आणि पर्यावरण उपमंत्री मौताझ दौआजी यांनी दमास्कस विमानतळावर भारताकडून आलेली ही मदत स्वीकारली. विमान जेनसेट, सौर दिवे, आपत्कालीन साहित्य, औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य आणि आपत्ती निवारण उपभोग्य वस्तूंसह 23 टनांहून अधिक मदत सामग्री आजच्या विमाना मधून पाठवण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news