मुंबई, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) महिला संघातील दुसर्या वन डे सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 3 धावांनी हरवले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 8 विकेटस् गमावत 258 धावा केल्या. भारताच्या दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाच्या अर्ध्या संघाची शिकार केली. 50 षटकांत यजमान संघाला 8 बाद 255 धावा करता आल्या. ऋचा घोषने विजयासाठी एकाकी झुंज दिली. तिचे शतक 4 धावांनी हुकले, अन् भारत विजयाला 3 धावांनी मुकला.
ऑस्ट्रेलियाच्या 258 धावांचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. यास्तिका भाटिया (14) आणि स्मृती मानधना (24) या दोघी बाद झाल्यावर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष यांची जोडी जमली. दोघींची 88 धावांची भागीदारी झाल्यावर जेमिमाह (44) बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही (5) लगेच बाद झाली. यानंतर दीप्ती शर्मा ऋचाला साथ देण्यासाठी मैदानावर आली; परंतु येथून पुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत भारतीय फलंदाजांवरील दबाव वाढवला. या दबावात विजयासाठी प्रयत्न करणारी ऋचा शतकाजवळ पोहोचली असताना बाद झाली. सुदरलँडने ही विकेट घेतली. तिने 96 धावा केल्या. यात 13 चौकार लगावले. यानंतर अमनज्योत कौर (4), पूजा वस्त्राकर (8) आणि हरलीन देओल (1) या स्वस्तात बाद झाल्या. शेवटच्या षटकात भारताला 16 धावा हव्या असताना 12 धावा निघाल्या, त्यामुळे भारताचा 3 धावांनी पराभव झाला. सुदरलँडने 43 धावांत 3 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का कर्णधार एलिसाच्या रूपाने बसला. 24 चेंडूंत 13 धावा केल्यानंतर तिला पूजा वस्त्राकरने बोल्ड केले. तर एलिस पेरीला दीप्ती शर्माने श्रेयंका पाटीलच्या हाती झेलबाद केले. पेरी 47 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा करून बाद झाली. बेथ मुनीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. 17 चेंडूत 10 धावा करून ती बाद झाली. मुनीला दीप्तीने पायचित केले. फोबी लिचफिल्ड 98 चेंडूंत 63 धावा करून बाद झाली. श्रेयंका पाटीलच्या चेंडूवर तिला ऋचा घोषने झेलबाद केले. (INDW vs AUSW)
कांगारू संघाला पाचवा धक्का अॅश्ले गार्डनरच्या रूपाने बसला. तिने सहा चेंडूंवर दोन धावा केल्या. ताहिला मॅकग्राथ 32 चेंडूंत 24 धावा करून दीप्ती शर्माची शिकार ठरली. त्याचवेळी अॅनाबेल सदरलँड (23) दीप्तीने तिच्याच चेंडूवर झेलबाद केले. अलाना किंग 28 आणि किम गर्थ 11 धावांवर नाबाद राहिले. भारताकडून दीप्ती शर्माने 38 धावांत 5 बळी घेतले.