दुबई, वृत्तसंस्था : भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये दोनवेळा धडक दिली. परंतु, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाला अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली, तर गतवर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने जेतेपदाचा चषक उंचावला. आता भारतीय संघ सलग तिसर्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याची संधी आहे आणि त्यांना उर्वरित 10 सामन्यांपैकी 5 सामने जिंकावे लागतील; पण भारताच्या विरोधात कोण यासाठी जोरदार रस्सीखेच आहे. (WTC Final )
ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवून भारतीय संघाचा ताण वाढवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील कसोटी टीम इंडियाने इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला आणि 2023-25 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मजबूत केले. या निकालानंतर थढउ 2023-25 गुणतालिकेतीवर नजर टाकल्यास, टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत केल्यानंतर 68.51 च्या विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे.
किवींविरुद्ध दुसर्या कसोटीत विजय मिळवण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाची विजयाची टक्केवारी 59 होती. परंतु, आता ती 62.50 झाली आहे. यासह ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला दुसर्या स्थानावरून मागे ढकलून भारताच्या जवळ पोहोचले आहेत. भारत पहिल्या क्रमांकावर, तर ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाचे अव्वल स्थान मिळविण्याचे टेन्शन वाढवले आहे. न्यूझीलंडनंतर (50 टक्के) बांगला देश (50) चौथ्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान 36.66 विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.