पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा महामुकबला होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत उभय संघ एकमेकांना भीडणार आहेत. आज (दि. 10) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे. या सामन्यासाठी बाबर आझमने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. पण टीम इंडियाच्या प्लेईंग 11 ची निवड करण्याचे कोडे रोहित शर्मा सोडवण्यात कसरत करावी लागणार आहे. वास्तविक, केएल राहुल फिट झाल्यानंतर भारतीय संघात सामील झाला आहे, तर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर पुन्हा श्रीलंकेत पोहचला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या या ब्लॉकबस्टर सामन्यात रोहित शर्मा अंतिम 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश करणार आणि कोणाला बेंचचर बसवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
दुखापतीमुळे आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसलेल्या केएल राहुलच्या अनुपस्थितीत, इशान किशनने संघासाठी यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात या युवा खेळाडूने मधल्या फळीत आपले कौशल्य दाखवत शानदार अर्धशतक झळकावले. किशनची 82 धावांची शानदार खेळी अशा वेळी घडली जेव्हा भारतीय संघ दडपणाखाली होता. 66 धावांत आपले टॉप-4 फलंदाज गमावले होते. किशनने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी वेस्ट इंडिजमध्ये सलग तीन अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याचा फॉर्म पाहता त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असे वाटत नाही.
राहुलबद्दल चर्चा करायची झाल्यास तो 2019 च्या विश्वचषकापासून टीम इंडियाच्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज आहे. 5व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 18 सामन्यात 53 च्या सरासरीने 742 धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याने शतकही झळकावले आहे. राहुलचे हे आकडे पाहता त्याला बाहेर बसवणे कठीण जाईल.
तथापि, इशान किशनचा अलीकडचा फॉर्म लक्षात घेता कर्णधार रोहित हा राहुलची निवड न करण्याचा कठोर निर्णय घेऊ शकतो. वास्तविक, आयपीएल 2023 मध्ये दुखापत झाल्यानंतर राहुलने कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध धोका पत्करणे टाळू इच्छितो.
जसप्रीत बुमराह आशिया कप 2023 च्या पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. मात्र, पावसामुळे त्याला त्या सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर दुस-याच दिवशी पहिल्या मुलाच्या जन्मासाठी तो भारतात परतला. त्यामुळे नेपाळविरुद्धच्या पुढच्या सामन्यात तो खेळू शकला नाही.
बुमराहच्या अनुपस्थितीत, मोहम्मद शमीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले आणि नेपाळविरुद्ध त्याने समाधानकारक गोलंदाजी केली. त्याने 1 बळीही मिळवला. आता बुमराह पुन्हा श्रीलंकेत दाखल झाला आहे त्यामुळे रविवारी होणा-या सामन्यसाठी त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन निश्चित मानले जात आहे, मात्र त्याच्या आगमनानंतर कोणाला वगळले जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बूमराहच्या पुनरागमनामुळे शमी किंवा शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमधून काढून टाकले जाऊ शकते. रोहित शर्माला मजबूत वेगवान आक्रमण हवे असेल, तर त्याला आज बुमराह आणि शमी या दोघांनाही खेळवावे लागेल.
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शहा.