पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Netherlands ICC World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेत भारताने 8 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. आता 12 नोव्हेंबरला टीम इंडियाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच नेदरलँड संघात मोठा बदल झाला आहे. डच संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण तरीही त्यांना ऐनवेळी बदल करावा लागला आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेदरलँडचा वेगवान गोलंदाज रायन क्लायने पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा नोहा क्रॉस याचा संघात समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी टूर्नामेंट इव्हेंट टेक्निकल कमिटीने या बदलाला मान्यता दिली. रविवारी होणा-या सामन्यात क्रॉसचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. (India vs Netherlands ICC World Cup 2023)
नोहा क्रॉसने आपल्या देशासाठी फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात तो खेळला होता. त्या सामन्यात या 23 वर्षीय खेळाडूने केवळ सात धावा केल्या होत्या. दुसरीकडे, दुखापतग्रस्त खेळाडू रायन क्लेनने या स्पर्धेत नेदरलँडकडून फक्त एकच सामना खेळला आहे. हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याला 7 षटकांत एकही बळी घेता आला नाही. (India vs Netherlands ICC World Cup 2023)
नेदरलँडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सध्याच्या विश्वचषकाच्या गुणतालिकेत संघ 4 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे. भारताविरुद्धचा सामना विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्ससाठी महत्त्वाचा नसला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल. कारण त्याचा रनरेट इतर संघांच्या तुलनेत खूपच खराब आहे. या स्थितीत संघ 6 गुणांसह 7व्या किंवा 8व्या स्थानावर असेल आणि पात्र ठरेल. पराभव झाल्यास संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेतून बाहेर पडेल. (India vs Netherlands ICC World Cup 2023)
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, नोहा क्रॉस, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद, सायब्रांड एंजेलब्रेक्ट.