पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : वर्ल्डकपमध्ये लागोपाठ चौथा सामना जिंकत रोहित शर्माच्या टीम इंडियाने पुण्याच्या मैदानात बांगलादेश संघाला धूळ चारली. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहला आहे. रोहित सेनेचा पुढचा सामना 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून 256 धावा केल्या. याचबरोबर वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर 257 धावांचे लक्ष्य होते. जे टीम इंडियाने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर आरामात पार केले.
पुण्यातील एमसीए मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 8 विकेट गमावत 256 धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 48वे शतक झळकावले, तर शुभमन गिलने 10वे अर्धशतक झळकावले. गिलने रोहितसोबत 76 चेंडूत 88 धावांची सलामी दिली.
रोहित बाद झाल्यानंतरही धावांचा वेग कमी झाला नाही. गिल आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 44 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत केले. या काळात भारताला गिल आणि श्रेयस अय्यर (19) यांच्या विकेट्स अल्पावधीतच गमवाव्या लागल्या. पण त्यानंतर केएल राहुलच्या साथीने विराट कोहने धावा काढतच राहिला. विराटने वनडे करिअरमधील 48 वे शतक पूर्ण केले. त्याने शानदार खेळीचे प्रदर्शन करून 97 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. केएल राहुलने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 34 धावा केल्या. कोहली आणि राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची अखंड भागीदारी केली आणि टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
बांगलादेशचे गोलंदाजी आक्रमणही उद्ध्वस्त करून कोहलीने विशेष कामगिरी केली. या डावात 77वी धावा करून त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील 26,000 धावा (566 वा डाव) पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला.
26,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार करणारा कोहली जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याने 510 सामन्यांच्या 566व्या डावात ही कामगिरी केली. या यादीत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 664 सामन्यांच्या 782 डावांमध्ये 34,457 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा (28,016) आणि तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंग (27,483) आहे.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 63 धावा जोडल्या. बांगलादेशची पहिली विकेट 93 धावांवर पडली. तंजिद 43 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला पायचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल आठ धावा करून जडेजाचा बळी ठरला. महेदी हसनला तीन धावांवर सिराजने बाद केले. यानंतर लिटन दासही 66 धावा करून जडेजाचा बळी ठरला.
पहिली विकेट 93 धावांवर गमावलेल्या बांगलादेशची अवस्था 4 बाद 137 अशी झाली. यानंतर मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 16 धावांवर तौहीदला बाद केले. रहीमही 38 धावा करून बुमराहचा बळी ठरला. अखेरीस महमुदुल्लाहने 36 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. शेवटच्या षटकात बुमराहने महमुदुल्लाहला अर्धशतक करू दिले नाही आणि त्याला शानदार यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशची धावसंख्या 256 धावांपर्यंत नेली. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पंड्या जखमी झाला. चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करताना त्याच्या पायाच्या स्नायूंना ताण आला. यामुळे त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने त्याच्या ओव्हरचे उर्वरित तीन चेंडू टाकले. हार्दिकच्या दुखापतीची तीव्रता समजू शकलेली नाही, मात्र तो स्कॅनसाठी रुग्णालयात गेला असून त्याला दुसऱ्या डावातही फलंदाजीला येणे कठीण असल्याची चर्चा आहे.