पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 : भारताने पहिल्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 17.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. शिवम दुबेने 40 चेंडूत 60 धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी, रिंकू सिंह नऊ चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला.
यासह टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध आपला अपराजित विक्रम कायम ठेवला आहे. टी-20 मधील भारताचा अफगाणिस्तानवरचा हा सलग पाचवा विजय आहे. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.
14 महिन्यांनंतर पुनरागमन करणारा रोहित शर्मा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहितने मिडऑफवर एक शॉट खेळला. तिथे उपस्थित क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड झाला आणि तोपर्यंत रोहितने धाव घेत दुसरे टोक गाठले होते. मात्र, शुभमनने क्रीज सोडले नाही आणि नॉन स्ट्रायकर एंडवरच राहिला. अशा स्थितीत रोहित धावबाद झाला. पॅव्हेलियनमध्ये परतताना तो नाराज दिसला आणि त्याने शुभमनविरुद्ध नाराजी व्यक्त केली. त्यानंतर चौथ्या षटकात 28 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. शुभमन गिल 12 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला. मुजीब उर रहमानने त्याला गुरबाजकरवी यष्टिचित केले.
भारताला तिसरा धक्का नवव्या षटकात 72 धावांवर बसला. तिलक वर्मा 22 चेंडूंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 26 धावा करून बाद झाला. त्याला अजमतुल्ला उमरझाईने गुलबदिन नायबच्या हाती झेलबाद केले. जितेश शर्माच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला. मुजीबने जितेशला झद्रान करवी झेलबाद केले. तो 20 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावा करून बाद झाला. त्याने शिवमसोबत 45 धावांची भागीदारी केली. यानंतर शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी भारताला विजय मिळवून दिला.
मोहालीच्या मैदानावर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. अफगाणिस्तानची भारताविरुद्धची टी-20 मधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. मोहम्मद नबीने सर्वाधिक 27 चेंडूत 42 धावांची खेळी केली. अजमतुल्ला उमरझाईने 29 धावा केल्या. नजीबुल्लाहने अखेरीस 19 धावांची इनिंग खेळली. भारतीय संघाकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी दोन-दोन गडी बाद केले. शिवम दुबेला एक विकेट मिळाली.
भारताकडून पहिले षटक अर्शदीप सिंगने टाकले, ज्यात एकही धाव निघाली नाही. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने हे षटक खेळून काढले. त्यानंतरही पॉवरप्लेच्या वेळी भारतीय गोलंदाजांनी तगडी गोलंदाजी केली, त्यामुळे अफगाणिस्तानचे फलंदाज जलद धावा करण्यात अपयशी ठरले. पहिल्या 6 षटकांनंतर अफगाण संघाने एकही विकेट न गमावता 33 धावा केल्या.
अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि कर्णधार इब्राहिम झद्रान यांच्यात 50 धावांची सलामी भागीदारी झाली. गुरबाजने षटकार ठोकत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने गुरबाजला (23) माघारी धाडले. गुरबाजला यष्टिरक्षक जितेश शर्माने यष्टिचित केले. त्यानंतर 8.2 व्या षटकात शिवम दुबेने दुसरा सलामीवीर झद्रानला रोहितकरवी झेलबाद करून अफगाणिस्तानला दुसरा धक्का दिला. झद्रानने 25 धावांची खेळी केली. त्यानंतर आपला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रहमत शाह केवळ 3 धावा करून बाद झाला. अशाप्रकातरे अफगाणिस्तानने 57 धावांत 3 विकेट गमावल्या.
कठीण काळात उमरझाई आणि नबी यांनी जबाबदारीने खेळ केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. नबीने आक्रमक फलंदाजी केली आणि उमरझाईने त्याला चांगली साथ दिली. आपला 28 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा उमरझाई 22 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. त्यानंतर नबी 27 चेंडूत 42 धावांची खेळी खेळून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.
अक्षरने 4 षटकात 23 धावा देत 2 बळी तर शिवमने 2 षटकांत 9 धावा देत 1 बळी घेतला. मुकेशने 8.20 च्या इकॉनॉमी रेटने 33 धावा देत 2 बळी मिळवले. लेगस्पिनर रवी बिश्नोईने 3 षटकात 35 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरने 3 षटकात एकही विकेट न घेता 27 धावा दिल्या.
भारताने टॉस जिंकला
पहिल्या टी-20 मध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन हा सामना खेळत नाहीय. यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माला प्राधान्य देण्यात आले आहे. जितेशचे हे घरचे मैदान आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.
हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत फिनिशर म्हणून आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची जबाबदारी रिंकू सिंहवर असेल. दक्षिण आफ्रिकेत त्याने चमकदार कामगिरी केली. येथेही त्याने पुन्हा एकदा लक्षवेधी कामगिरी केल्यास टी-20 विश्वचषकासाठी संघातील त्याची निवड जवळपास निश्चित मानली जाईल.
रोहित शर्माने सांगितले की, यशस्वी जैस्वाल आजचा सामना खेळत नाहीय. त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे शुभमन गिल सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. संजू सॅमसनलाही स्थान मिळालेले नाही. जितेश शर्माला यष्टिरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अष्टपैलू म्हणून शिवम दुबेसह अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान मिळाले आहे. स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला स्थान मिळालेले नाही, त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. संघात एकूण तीन फिरकीपटू ठेवण्यात आले आहेत. तसेच अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारच्या रूपात दोन वेगवान गोलंदाज आहेत.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.