IND vs AFG T20 : भारताचे अफगाणिस्तानला 213 धावांचे लक्ष्य, रोहित-रिंकूची धमाकेदार खेळी

IND vs AFG T20 : भारताचे अफगाणिस्तानला 213 धावांचे लक्ष्य, रोहित-रिंकूची धमाकेदार खेळी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 : कर्णधार रोहित शर्माचे धमाकेदार शतक (नाबाद 121) आणि रिंकू सिंहच्या (नाबाद 69) अर्धशतकाच्या जोरावर भारताने टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने बंगळूरमध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फरीद अहमद मलिकने सर्वाधिक 3 बळी घेतले.

22 धावांवर भारताने चार विकेट गमावल्या. विराट कोहली आणि संजू सॅमसन हे दोघेही गोल्डन डकवर बाद झाले. तर यशस्वी जैस्वालने चार आणि शिवम दुबेने एक धावा काढून माघारी परतले. भारतीय संघ अडचणीत सापडला होता. अशा कठीण प्रसंगी कर्णधार रोहित शर्माने रिंकू सिंहच्या साथीने संघाचा डाव खांबीरपणे सांभाळला आणि पाचव्या विकेटसाठी विक्रमी नाबाद 190 धावांची भागीदारी रचली.

रोहितने बुधवारी 69 चेंडूंचा सामना करत 121 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि 8 षटकार आले. या शतकासह तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याने भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल यांना मागे टाकले आहे. या दोघांच्या नावावर 4-4 शतके आहेत. बाबर आझम, कॉलिन मुनरो आणि के सबावून डेव्हिस प्रत्येकी 3 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. रोहितच्या नावावर आता टी-20 मध्ये 5 शतके झाली आहेत.

रोहित हा कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आपल्या खेळीदरम्यान कोहलीचा मोठा विक्रम मोडला. कर्णधार म्हणून कोहलीने 47.57 च्या सरासरीने 1,570 धावा केल्या होत्या. या काळात त्याच्या बॅटमधून 13 अर्धशतके झळकावली होती. रोहित आणि कोहली व्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी हा एकमेव खेळाडू आहे ज्याने भारतीय कर्णधार म्हणून 1,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रोहितचे शतक, रिंकूचे अर्धशतक

रोहित शर्माने त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. या फॉरमॅटमध्ये शतके झळकावण्याच्या बाबतीत तो पुन्हा अव्वल स्थानी पोहोचला आहे. रोहितने अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर चौकार मारून 64 चेंडूत शतक पूर्ण केले. याशिवाय रिंकूने 36 चेंडूत अर्धशतक झळकावले.

रोहितचे अर्धशतक

रोहितने 40 चेंडूत आपल्या टी-20 कारकिर्दीतील 30 वे अर्धशतक झळकावले. 14 महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहितला गेल्या दोन सामन्यांमध्ये खातेही उघडता आले नाही. मात्र, या सामन्यात त्याने जबरदस्त पुनरागमन करत अर्धशतक झळकावले. 14 षटकांनंतर भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 100 हून अधिक धावा केल्या.

भारताला तिसरा धक्का

21 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. अजमतुल्ला उमरझाईने शिवम दुबेला यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजकरवी झेलबाद केले. दुबेला एक धाव करता आली.

फरीद अहमदचा डबल धमाका

फरीद अहमदने तिस-या षटकात भारताला सलग दोन धक्के दिले. त्याने 2.3 व्या षटकात 18 धावांवर यशस्वी जैस्वाल (4) आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीला बाद केले.

रोहितचे खाते सातव्या चेंडूवर उघडले

या सामन्यात सात चेंडू खेळून रोहितने आपले खाते उघडले. अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात रोहितला एकही धाव काढता आली नव्हती. पहिल्या टी-20 मध्ये तो खाते न उघडता धावबाद झाला होता, तर दुसऱ्या टी-20 मध्ये तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

पहिली धाव काढायला रोहितची धडपड

फरीद अहमदने पहिले षटक टाकले. यशस्वीने पहिल्याच चेंडूवर तीन धावा घेतल्या. यानंतर रोहितने पाच चेंडू खेळून काढले. मात्र त्याच्या बॅटमधून एकही धाव निघाली नाही. यादरम्यान, रोहितच्या पायावर चेंडू आदळून दोन चौकार मिळाले. या धावा अतिरिक्त मध्ये जोडल्या गेल्या.

भारतीय संघात तीन बदल

भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले आहेत. संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव यांचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी जितेश शर्मा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या प्लेइंग-11 मध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नवीन उल हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी यांना प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे.

सलग दोन सामने जिंकून टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा हा सामना जिंकून पाहुण्या अफगाणिस्तानला क्लिन स्विप देण्याचा जोरदार प्रयत्न करेल.

भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.

अफगाणिस्तानचा संघ : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news