IND vs AFG : भारताचा अफगाणिस्तानवर ६ गडी राखत विजय

IND vs AFG T20
IND vs AFG T20

इंदूर, पुढारी वृत्तसेवा :  भारताने अफगाणिस्तानला दुसर्‍या टी-20 सामन्यात 6 विकेटस्नी हरवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला 172 धावांत रोखल्यानंतर टीम इंडियाच्या यशस्वी जैस्वाल (68) आणि शिवम दुबे (63*) या युवा शिलेदारांनी 15.4 षटकांतच 26 चेंडू शिल्लक ठेवून हे आव्हान गाठून दिले. मालिकेतील तिसरा सामना बंगळूरला बुधवारी खेळवण्यात येणार आहे. (IND vs AFG)

इंदूरच्या छोट्या मैदानावर 173 धावांचे लक्ष्य टीम इंडियाला छोटे पडणार हे निश्चित होते; परंतु चाहत्यांना उत्सुकता होती, ती रोहित आणि विराटच्या बॅटिंगची; पण दुर्दैवाने दुसर्‍या टी-20 सामन्यातही रोहित शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. त्यानेही काही क्लासिक शॉट मारले, पण युवा यशस्वी जैस्वालच्या झंझावातापुढे तो झाकोळला जात होता. शेेवटी 16 चेंडूंत 29 धावा करून विराट इब्राहिम झद्रानकडे झेल देऊन परतला. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये त्याला भिडलेल्या नवीन-उल-हकनेच त्याची विकेट घेतली.
पण यानंतर भारताच्या यशस्वी आणि शिवम यांनी दणकेबाज खेळीला सुरुवात केली. पहिल्यांदा यशस्वीने 27 चेंडूंत अर्धशतक गाठले, त्यानंतर त्याने दुबेसोबत तिसर्‍या विकेटसाठी 25 अर्धशतकी भागीदारी केली. पाठोपाठ दुबेनेही 22 चेंडूंत 50 ची धावसंख्या पार केली. हे दोघेच संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असताना करीम जनतने यशस्वीला यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 34 चेेंडूंत 68 धावा करताना 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. याच षटकात जितेश शर्मा (0) आल्या पावली परतला.

त्यानंतर शिवम दुबेने रिंकू सिंगच्या मदतीने 15.4 षटकांत टार्गेट गाठले. दुबे 32 चेेंडूंत 63 धावा करून नाबाद राहिला. त्याने 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले. रिंकूने 9 धावा केल्या. (IND vs AFG)

 भारताला 173 धावांचे आव्हान

तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची खराब सुरुवात झाली. पण, गुलबद्दिन नईबने महत्त्वपूर्ण 57 धावांची खेळी करून यजमानांना कडवे आव्हान दिले. लहान मैदान अन् अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांची खराब गोलंदाजी झाली. अफगाणिस्तानने एकोणीसाव्या षटकात 19 धावा कुटल्या. अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 172 धावा केल्या. अफगाणिस्तानने आतापर्यंतची भारताविरुद्धची ही सर्वाधिक धावसंख्या उभारली आहे. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले. तर अष्टपैलू शिवम दुबेने एक बळी पटकावला.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : 20 षटकांत सर्वबाद 172 धावा. (गुलबद्दिन नईब 57, नजीबउल्लाह झद्रान 23, मुजीब उर रहमान 21. अर्शदीप सिंग 3/32, अक्षर पटेल 2/17)

भारत : 15.4 षटकांत 4 बाद 173 धावा. (यशस्वी जैस्वाल 68, शिवम दुबे नाबाद 63, विराट कोहली 29. करीम जनत 2/13, फझलहक फारुकी 1/28.)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news