Praggnanandhaa vs Magnus carlsen : १६ वर्षीय प्रज्ञानंदच्या चालीसमोर अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन चितपट!

Praggnanandhaa vs Magnus carlsen
Praggnanandhaa vs Magnus carlsen

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने (r Praggnanandhaa) बुद्धिबळ क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असणा-या मास्टर मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. प्रग्नानंदने ३९ चालींमध्ये कार्लसनला (magnus carlsen) मात दिली. एअरथिंग्ज मास्टर्स (Airthings Masters) या ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.

विजयानंतर प्रज्ञानंदची (r praggnanandhaa) १२ व्या क्रमांकावर झेप

या विजयानंतर भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचे ८ गुण झाले असून तो ८ व्या फेरीनंतर संयुक्त १२ व्या स्थानावर पोहचला आहे. मागील फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या कार्लसनवर (magnus carlsen) प्रज्ञानंदचा (r Praggnanandhaa) विजय अनपेक्षित होता. याआधी त्याने फक्त लेव्ह अरोनियनविरुद्ध विजय नोंदवला होता. याशिवाय प्रज्ञानंदने दोन सामने अनिर्णित खेळले, तर ४ मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

रशियाचा इयान नेपोमनियाचची गुणतालिकेत अव्वल स्थानी..

प्रज्ञानंदने (r Praggnanandhaa) अनिश गिरी आणि क्वांग लिम यांच्याविरुद्ध सामने अनिर्णित ठेवले होते, तर एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिजस्टॉफ डुडा आणि शाखरियार मामेदयारोव्ह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सामन्यात पराभूत झालेला रशियाचा इयान नेपोमनियाचची १९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

डिंग लिरेन आणि हॅन्सन यांचे गुण समान असून ते इयाननंतर संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. एअरथिंग्स मास्टर्समध्ये १६ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. या बुद्धिबळपटूंना स्पर्धेतील प्रत्येक विजयासाठी ३ गुण आणि ड्रॉसाठी १ गुण मिळतात. पहिल्या टप्प्यातील अजून ७ फेऱ्या खेळायच्या आहेत.

२०१८ मध्ये प्रज्ञानंदने १२ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावून भारतीय दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांचा विक्रम मोडला होता. विश्वनाथ आनंदने वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता. याआधी २०१६ मध्ये प्रज्ञानंदने यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर होण्याचा किताबही पटकावला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news